Home क्राईम जळगाव रेल्वे स्थानकावर अमृतसर एक्सप्रेसच्या जनरेटर बोगीला आग ; कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने मोठा...

जळगाव रेल्वे स्थानकावर अमृतसर एक्सप्रेसच्या जनरेटर बोगीला आग ; कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला

0
12


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुंबईहून अमृतसरकडे जाणाऱ्या ११०५७ अमृतसर एक्सप्रेसच्या जनरेटर बोगीच्या ब्रेक डिस्कला आग लागल्याची घटना बुधवारी १ जुलै रोजी सकाळी जळगाव रेल्वे स्थानकावर घडली. अचानक धूर निघू लागल्याने प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र रेल्वे कर्मचारी आणि तांत्रिक अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे अवघ्या तासाभरात परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आले आणि संभाव्य मोठा अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, अमृतसर एक्सप्रेस सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास जळगाव रेल्वे स्थानकावर दाखल झाली होती. याचवेळी रेल्वे रुळाला लागलेली एक चावी उडून डीव्हीला लागल्याने एअर प्रेशर अचानक रिलीज झाले. त्यामुळे सामान ब्रेक आणि जनरेटर कार बोगीचे ब्रेक अचानक दाबले गेले. ब्रेक अचानक लागल्याने ब्रेक डिस्कमध्ये मोठ्या प्रमाणावर घर्षण निर्माण झाले आणि त्यातून उष्णता वाढून आग लागली. काही वेळातच जनरेटर बोगीच्या परिसरातून धुराचे मोठे लोट बाहेर येऊ लागले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे स्थानकावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आणि प्रवाशांमध्ये भीती पसरली.

घटनेची माहिती मिळताच रेल्वे स्थानकावरील कर्मचारी आणि संबंधित विभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रसंगावधान राखत जनरेटर बोगीतील दोन फायर एक्स्टिंग्विशरच्या मदतीने आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. कर्मचाऱ्यांच्या जलद हालचालीमुळे आग पसरण्यापूर्वीच नियंत्रण मिळवता आले. दरम्यान, भुसावळ येथे ड्युटी पूर्ण करून इगतपुरी मेमूने घरी जात असलेले तांत्रिक सहाय्यक देवेंद्र गुरव हे जळगाव स्थानकावर उतरले असता त्यांच्या निदर्शनास ही घटना आली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांनी आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केली आणि एअर प्रेशर नियंत्रित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.

आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवल्यानंतर रेल्वेच्या यंत्रणेची सखोल तपासणी करण्यात आली. सर्व यंत्रणा सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतर सकाळी सुमारे ८.१५ वाजता अमृतसर एक्सप्रेस पुढील प्रवासासाठी भुसावळच्या दिशेने रवाना करण्यात आली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही तसेच कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही. मात्र रेल्वे कर्मचारी आणि तांत्रिक अधिकाऱ्यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे मोठा अपघात टळल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केली.


Protected Content

Play sound