Home Cities यावल यावलच्या बोरावल गेट परिसरातील अनधिकृत मांस विक्री बंद करा; राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची...

यावलच्या बोरावल गेट परिसरातील अनधिकृत मांस विक्री बंद करा; राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची मागणी

0
22


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील बोरावल गेट परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत व उघड्यावरील मांस विक्रीविरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. शाळा आणि महापुरुषांच्या स्मारकांसमोर सुरू असलेल्या या विक्रीमुळे दुर्गंधी, अस्वच्छता आणि नागरिकांना होणाऱ्या त्रासाकडे लक्ष वेधत संघटनेच्या वतीने यावल नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, यावल शहरातील बोरावल गेट परिसरात मराठी मुलींच्या शाळेच्या अगदी लगत मोठ्या प्रमाणात चिकन, मटण आणि इतर मांस विक्रीची दुकाने उघड्यावर सुरू आहेत. या उघड्यावरील विक्रीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत असून, त्याचा त्रास शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, व्यापारी आणि परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे.

नगरपरिषदेने मांस विक्रेत्यांसाठी स्वतंत्र मार्केटची जागा उपलब्ध करून दिलेली असतानाही संबंधित विक्रेते बोरावल गेट परिसरात अनधिकृतपणे व्यवसाय करत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने कारवाई करणे आवश्यक असल्याची मागणी करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, बोरावल गेट परिसरात छत्रपती शिवाजी महाराज आणि बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्मारके आहेत. या पवित्र स्मारकांच्या समोर उघड्यावर मांस विक्री होत असल्याने नागरिकांच्या भावना दुखावत असून, शिव-भिम अनुयायांमध्ये नाराजी निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष राकेश सोनार यांनी प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत नाराजी व्यक्त केली. बोरावल गेट परिसरातील अनधिकृत मांस विक्री त्वरित बंद करून संबंधित विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करावी तसेच त्यांना नगरपरिषदेने निश्चित केलेल्या अधिकृत जागेवर स्थलांतरित करावे, अशी मागणी त्यांनी केली.

परिसरातील स्वच्छता, नागरिकांचे आरोग्य आणि स्मारकांची पवित्रता लक्षात घेता प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अन्यथा प्रशासनाने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे.


Protected Content

Play sound