


रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर शहरात रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. गटारी तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहू लागले, तर नागझिरी नदीला पुन्हा पूर आल्याने नदीकाठच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
शहरातील विविध भागांमध्ये पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्याने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. काही ठिकाणी पावसाचे पाणी थेट घरांमध्ये शिरल्याने नागरिकांचे नुकसान झाले. शिवाजी चौक परिसरातील बापू महाजन यांच्या घरात पाणी घुसल्याने त्यांची मोठी गैरसोय झाली. प्रशासनाने या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे. मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती नागरिकांनी आमदार अमोल जावळे यांना दिली. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन आमदारांनी दिले. यावेळी नगरसेवक पद्माकर महाजन आणि राजेश शिंदे यांनी पाणी साचलेल्या भागांची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. दरम्यान, नागझिरी नदीला पूर आल्याने नदीकाठच्या भागातील नागरिकांची धावपळ उडाली. पावसाचा जोर कायम राहिल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनाने सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
भगवती नगर परिसरात एका नारळाच्या झाडावर वीज कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच पाराच्या गणपती परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला असून नागरिकांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागला. शहरातील पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी रावेर शहरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. दरवर्षी पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या या समस्येवर प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.



