


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर विधानसभा मतदारसंघातील SIR-2026 (Special Intensive Revision) प्रक्रियेदरम्यान काही मतदान केंद्रांवरील मतदार मॅपिंग व पडताळणीचे प्रमाण संशयास्पद असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रक्रियेतील पारदर्शकता आणि निष्पक्षतेबाबत प्रश्न उपस्थित करत रावेर-यावल विधानसभा क्षेत्रप्रमुख तथा BLA-1 विलास चौधरी यांनी संबंधित मतदान केंद्रांची स्वतंत्र, निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी निवडणूक प्रशासनाकडे केली आहे.
याबाबत विलास चौधरी यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य तसेच भारत निवडणूक आयोग यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात रावेर आणि यावल तालुक्यातील काही मतदान केंद्रांवर SIR-2026 अंतर्गत मतदार मॅपिंग व पडताळणीचे काम अत्यंत मोठ्या प्रमाणावर पूर्ण झाल्याचे दाखविण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
निवेदनानुसार, काही विशिष्ट मतदान केंद्रांवरील मॅपिंग व पडताळणीचे प्रमाण इतर मतदान केंद्रांच्या तुलनेत असामान्यरीत्या जास्त असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे या प्रक्रियेत समान निकषांचा वापर झाला आहे का, कार्यपद्धती सर्व ठिकाणी एकसमान होती का आणि प्रत्यक्ष पडताळणी करताना पारदर्शकता राखण्यात आली आहे का, याबाबत गंभीर शंका निर्माण होत असल्याचे विलास चौधरी यांनी नमूद केले आहे. मतदार यादीच्या अचूकतेसाठी आणि निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेसाठी SIR-2026 मॅपिंग प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे काही मतदान केंद्रांवरील नोंदी, मॅपिंगचे प्रमाण आणि पडताळणीची प्रत्यक्ष स्थिती यांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत तपासणी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
संबंधित मतदान केंद्रांवर वापरण्यात आलेले निकष, प्रत्यक्ष करण्यात आलेली पडताळणी, नोंदविण्यात आलेली माहिती आणि उपलब्ध आकडेवारी यांची सखोल तपासणी करण्यात यावी. आवश्यक असल्यास संबंधित प्रक्रियेची पुनर्पडताळणी (Re-verification) करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. या प्रकरणी निवडणूक प्रशासनाने निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हा निवडणूक अधिकारी, मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य तसेच भारत निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आल्या आहेत.



