Home Cities जळगाव शाहू महाराजांचा विचार म्हणजे सामाजिक न्यायाचा दीपस्तंभ – पालकमंत्री गुलाबराव पाटील

शाहू महाराजांचा विचार म्हणजे सामाजिक न्यायाचा दीपस्तंभ – पालकमंत्री गुलाबराव पाटील

0
13


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जळगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे सामाजिक न्याय दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी समाजातील विविध घटकांसाठी शासनाच्या योजनांचा लाभ देत लाभार्थ्यांना नियुक्ती आदेश, आर्थिक सहाय्य, व्यवसायासाठी साहित्य तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

“राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी समाजातील वंचित, दुर्बल आणि उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायाचा त्यांनी लावलेला वटवृक्ष आजही समाजाला मार्गदर्शन करणारा आहे. सामाजिक न्याय दिन हा मानवतेचा जागर करण्याचा दिवस असून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाच्या संधी, समान अधिकार आणि सन्मानाने जगण्याची संधी पोहोचणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

समाजकल्याण विभागातर्फे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री गुलाबराव पाटील होते. यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक विशाल राठोड, विशेष अधिकारी अमोल कुलकर्णी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, समाजसेवक, विद्यार्थी, लाभार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शाहू महाराजांना अभिवादन केले.

प्रास्ताविक करताना समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या सामाजिक समता, शिक्षण, आरक्षण आणि सामाजिक परिवर्तनातील योगदानाचा आढावा घेतला. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी समाजकल्याण विभाग कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, समाजकल्याण विभागाने प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत शासनाच्या योजना संवेदनशीलतेने आणि प्रभावीपणे पोहोचविण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, अत्याचारग्रस्त कुटुंबांना मदत, ऊसतोड कामगारांच्या वारसांना आर्थिक सहाय्य तसेच पारंपरिक व्यवसायांना बळ देण्यासाठी करण्यात येणारे उपक्रम हे सामाजिक न्यायाची संकल्पना प्रत्यक्षात आणणारे आहेत.

यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी राजर्षी शाहू महाराज यांचे समतावादी आणि लोककल्याणकारी विचार आजही समाजाला दिशा देणारे असल्याचे सांगितले. त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन प्रत्येकाने समाजहित आणि प्रगतीसाठी कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनीही राजर्षी शाहू महाराज यांच्या शिक्षणप्रेमी आणि समाजहितवादी विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. समता, शिस्त आणि सामाजिक जबाबदारीची भावना ठेवून समाजाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करण्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माजी प्राचार्य प्रा. बडगुजर यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या सामाजिक सुधारणांचा सविस्तर आढावा घेतला. स्त्री शिक्षण, आरक्षण, अस्पृश्यता निर्मूलन आणि सामाजिक परिवर्तनासाठी शाहू महाराजांनी केलेले कार्य आजच्या काळातही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमांतर्गत दिवंगत व्यक्तींच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती आदेश देण्यात आले. तसेच राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार प्राप्त ४३ विद्यार्थ्यांपैकी प्रतिनिधिक स्वरूपात ४ विद्यार्थ्यांचा शाल, पुष्पगुच्छ, प्रशस्तीपत्र आणि प्रत्येकी पाच हजार रुपयांचा धनादेश देऊन गौरव करण्यात आला. याशिवाय मयत ऊसतोड कामगारांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य वितरित करण्यात आले. चर्मकार समाजातील १० गटई कामगारांना व्यवसायासाठी स्टॉलचे वाटप करून त्यांच्या पारंपरिक व्यवसायाला चालना देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद ढगे यांनी केले, तर कार्यालय अधीक्षक राजेंद्र कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सामाजिक न्याय दिनाचा हा कार्यक्रम समाजातील विविध घटकांना शासनाच्या योजनांशी जोडणारा आणि सामाजिक समतेचा संदेश देणारा ठरला.


Protected Content

Play sound