Home Cities जळगाव डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयाचा पहिल्याच वर्षी ९९ टक्के निकाल 

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयाचा पहिल्याच वर्षी ९९ टक्के निकाल 

0
11


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाच्या पहिल्याच बॅचने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाविद्यालयाच्या २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्षाचा निकाल तब्बल ९९ टक्के लागला असून, या उत्कृष्ट निकालामुळे महाविद्यालयाची खान्देशसह विदर्भातही वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयाच्या पहिल्या बॅचचा प्रथम वर्षाचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या परीक्षेत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत महाविद्यालयाचा निकाल उंचावला आहे. पहिल्याच वर्षी मिळालेले हे यश महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. महाविद्यालयातून मनुजा टोपे हिने ७७ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या यशासह सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी अभिनंदन करून कौतुक केले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामागे महाविद्यालयातील अनुभवी प्राध्यापकांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले आहे. आयुर्वेद महाविद्यालयाचे डीन डॉ. हर्षल बोरोले, रजिस्ट्रार चेतन चौधरी, शरीररचना (अ‍ॅनाटॉमी) विभागप्रमुख डॉ. उमाकांत चौधरी, संहिता विभागप्रमुख डॉ. सुगौतकुमार तायडे, क्रिया शरीर विभागप्रमुख डॉ. रूपाली चौधरी यांच्यासह डॉ. मुकेश चौधरी, डॉ. मयूरी चौधरी, डॉ. अंजना शिंदे आणि प्रा. अमिता निकम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

गोदावरी फाउंडेशनच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण वैद्यकीय शिक्षण देण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू असून, डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयाच्या पहिल्याच बॅचने मिळवलेले यश हे त्या प्रयत्नांचे फलित असल्याचे मानले जात आहे. पहिल्याच वर्षी ९९ टक्के निकाल मिळाल्याने महाविद्यालयाची शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिष्ठा वाढली असून, भविष्यातही विद्यार्थी उत्कृष्ट कामगिरी करतील, असा विश्वास संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound