Home Cities जळगाव नशामुक्त भारत अभियानांतर्गत जळगावात जनजागृती रॅली 

नशामुक्त भारत अभियानांतर्गत जळगावात जनजागृती रॅली 

0
15


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नशामुक्त भारत अभियान २०२६ अंतर्गत तसेच जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जळगाव शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली. समाज कल्याण कार्यालय, जिल्हा परिषद आणि चेतना व्यसनमुक्ती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीत नागरिकांना व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला.

शुक्रवार, दि. २६ जून रोजी सकाळी शिवतीर्थ मैदान येथून या रॅलीला सुरुवात झाली. रॅलीचा समारोप राष्ट्रपिता महात्मा गांधी उद्यान येथे करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते.

या रॅलीला प्रमुख अतिथी म्हणून कर्नल धीरज मिनोत्रा, महापौर दीपमाला काळे, एनसीसीचे शिवराज पाटील, सामाजिक कार्यकर्ते राहुल पाटील, विजय वानखेडे, चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे नितीन विसपुते, क्रीडा शिक्षक प्रवीण पाटील, संदीप सोनार, प्रवीण विसपुते आदी उपस्थित होते. रॅलीदरम्यान व्यसनाचे दुष्परिणाम, अंमली पदार्थांपासून होणारे सामाजिक आणि आरोग्यविषयक नुकसान याबाबत जनजागृती करण्यात आली. विविध घोषवाक्यांच्या माध्यमातून नागरिकांना व्यसनमुक्त समाज निर्माण करण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी महापौर दीपमाला काळे यांनी पालक आणि समाजातील जबाबदार घटकांनी लहान मुलांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. मुलांच्या भवितव्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन देणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. व्यसनमुक्त भारत अभियानाच्या माध्यमातून युवकांमध्ये जनजागृती निर्माण करणे, अंमली पदार्थांच्या सेवनापासून दूर राहण्याचा संदेश पोहोचवणे आणि निरोगी समाज निर्मितीचा संकल्प या उपक्रमातून करण्यात आला.


Protected Content

Play sound