


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पक्षाशी बंडखोरी करणाऱ्या सहा खासदारांच्या निषेधार्थ जळगाव शहरात आंदोलन करण्यात आले. शिवसेना (उबाठा) जळगाव महानगर प्रमुख शरद आबा तायडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात संबंधित खासदारांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला.
शिवसेना पक्षाशी बंडखोरी करणाऱ्या सहा खासदारांच्या भूमिकेचा निषेध करत शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी या आंदोलनाच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली.
यावेळी शिवसेना पक्षाची खिंड लढवणारे निष्ठावंत नेते संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर उपस्थित शिवसैनिकांनी जोरदार घोषणा देत पक्षाशी निष्ठा कायम ठेवण्याचा संदेश दिला. या आंदोलनात शिवसेना महिला महानगर प्रमुख मनिषाताई पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे, शिवसेना तालुकाप्रमुख प्रमोदभाऊ घुगे, किरण भाऊ भावसार, गणेशभाऊ गायकवाड, जिल्हा उपसंघटक योगेश चौधरी यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यावेळी राजेंद्र पाटील, मनसेचे प्रदीप पाटील, विनायक धर्माधिकारी, प्रेमराज राठोड, डॉ. रमाकांत कदम, भीमराव पांडव, अरुण सोनवणे, राजू पाटील, किरण ठाकूर, स्वप्निल राजपूत, संदीप माळी, किशोर धनगर तसेच शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना (उबाठा) कार्यकर्त्यांनी या आंदोलनातून पक्षनिष्ठा आणि संघटनेशी असलेली बांधिलकी व्यक्त केली असून, बंडखोरी करणाऱ्या नेत्यांविरोधातील आपला रोष जाहीर केला.



