Home क्राईम सागवान तस्करीवर वनविभागाची मोठी कारवाई ; २ लाखांचे सागवानी लाकूड जप्त

सागवान तस्करीवर वनविभागाची मोठी कारवाई ; २ लाखांचे सागवानी लाकूड जप्त

0
20


रावेर /यावल -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल वन्यजीव अभयारण्यातील जामन्या वन्यजीव क्षेत्रात अवैधरित्या सागवान लाकूड साठवून ठेवणाऱ्यांविरोधात वनविभागाने मोठी कारवाई केली आहे. वन्यजीव वनविभागाच्या पथकाने तस्करीच्या तयारीत असलेला सागवान इमारती मालाचा मोठा साठा जप्त केला असून याप्रकरणी वन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वन्यजीव नाशिक वनविभागांतर्गत येणाऱ्या यावल वन्यजीव अभयारण्याला समृद्ध वनसंपदा लाभली आहे. या अभयारण्यातील जामन्या वन्यजीव वनक्षेत्रात अवैधरित्या सागवानाची तोड करून लाकूड साठविण्यात आल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी जामन्या रूपेश दूसाने यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाईची तयारी केली होती.

उपवनसंरक्षक वन्यजीव नाशिक कृष्णा भवर आणि सहायक वनसंरक्षक सत्यजीत निकत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. भारतीय वन अधिनियम १९२७ तसेच वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अंतर्गत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी दुपारी २ वाजता सुरू झालेली ही कारवाई रात्री ८ वाजेपर्यंत तब्बल सहा तास सुरू होती. भर पावसात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी अतिसंवेदनशील वनक्षेत्रात शोधमोहीम राबवत सुमारे ६ ते ७ घनमीटर सागवानाचे ४५ ते ५० नग लाकूड जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या सागवानी लाकडाची बाजारभावानुसार किंमत अंदाजे २ लाख रुपये इतकी आहे.

जामन्या वनपरिक्षेत्रातील परिसरात अवैधरित्या सागवानाची तोड होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर वनक्षेत्रपाल रूपेश दूसाने यांनी कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार वनक्षेत्रात गस्त वाढविण्यात आली होती. बुधवारी वनविभागाच्या पथकाला अतिसंवेदनशील भागात सागवान लाकडाचा मोठा साठा आढळून आला. या कारवाईत वनपाल गणेश नगराळे, किरणसिंग राजपूत, वनरक्षक नोकेश बारेला, अब्दुल तडवी, आरिफ तडवी, जगदीश बारेला, आशा तडवी, अश्विनी पावरा, अरुण बारेला, दिनेश बारेला तसेच गस्ती पथकातील वनरक्षक रिला पावरा, निर्मला पावरा, पिंटू पावरा, पवन बारेला, संजय बारेला, सुरेश बारेला, निलेश बारेला, लालसिंग बारेला, जगदिश बारेला, रवीन बारला आणि संरक्षण वनमजूर यांनी सहभाग घेतला.


Protected Content

Play sound