Home Cities जळगाव पणन महासंघाच्या अध्यक्षपदी रोहित निकम यांची निवड !

पणन महासंघाच्या अध्यक्षपदी रोहित निकम यांची निवड !

0
16


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । खानदेशातील शेतकरी कुटुंबातून आलेले युवा सहकार नेते रोहित दिलीपराव निकम यांची महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन (पणन महासंघ) या राज्यातील शिखर सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी राहुल काकडे यांचीही सर्वानुमते निवड झाली. ही निवड गुरुवारी मुंबईतील मुख्यालयात पार पडलेल्या निवड प्रक्रियेत झाली.

विशेष बाब म्हणजे, गेल्या ७० वर्षांनंतर प्रथमच या महत्त्वाच्या सहकारी संस्थेच्या नेतृत्वाची धुरा भारतीय जनता पक्षाशी संबंधित नेतृत्वाकडे आली असून, सहकार क्षेत्रात या घडामोडीला मोठे राजकीय आणि आर्थिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

मुंबई येथील पणन महासंघाच्या मुख्यालयात सकाळी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवड प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत रोहित निकम यांची अध्यक्षपदी आणि राहुल काकडे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड निश्चित करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सह निबंधक, सहकारी संस्था मुंबईचे शाहजी पाटील यांनी कामकाज पाहिले.

निवडीनंतर बोलताना रोहित निकम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पणन मंत्री जयकुमार रावल, मंत्री हसन मुश्रीफ तसेच भाजप नेते गिरीश महाजन, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री संजय सावकारे यांचे आभार मानले.

ते पुढे म्हणाले की, शेतकरी हित, सहकार क्षेत्राची मजबुती आणि पारदर्शक व गतिमान प्रशासन या मूल्यांवर भर देत महासंघाचे काम अधिक प्रभावी केले जाईल. “सहकार से समृद्धी” या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी नव्या दिशा देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ही राज्यातील शेतकरी खरेदी-विक्री संघ, पणन प्रक्रिया संस्था आणि सहकारी संस्थांची शिखर संस्था असून कृषी उत्पादनांचे विपणन, साठवणूक आणि खरेदी-विक्री व्यवस्थापन यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे अध्यक्षपदाची जबाबदारी ही केवळ प्रशासकीय नसून लाखो शेतकऱ्यांच्या हिताशी निगडित असल्याचे मानले जाते.

रोहित निकम हे सहकार क्षेत्रातील अनुभवी नेतृत्व असून त्यांनी आजोबा बॅरिस्टर देवराव निकम आणि वडिलांचा सहकार वारसा पुढे नेत विविध संस्थांमध्ये नेतृत्व केले आहे. सध्या ते जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाचे संचालक तसेच जळगाव जिल्हा कृषी उद्योग व सर्व सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष आहेत. याशिवाय ते भाजप सहकार आघाडी, महाराष्ट्र राज्यचे सहसंयोजक म्हणूनही कार्यरत आहेत.

या निवड प्रक्रियेवेळी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, माजी आमदार जयंत पाटील, संचालक संजय पवार, अतुल गण्यारपवार, सुभाष रघातटे, रमेश हिंगणकर, नितीन हिवसे, सुनील चव्हाण, पांडुरंग घुगे, राहुल काकडे, संदीप नरके, प्रमोद रावराणे, आबासाहेब पाटील, बळवंत पाटील, धनश्रीदेवी घाटगे, अयोध्या धस, अशोक हटकर, दत्तात्रय पानसरे यांच्यासह व्यवस्थापकीय संचालक राहुल कुलकर्णी व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

राज्यातील सहकार क्षेत्रात नव्या नेतृत्वाचा उदय आणि शेतकरी केंद्रित धोरणांना बळ मिळण्याच्या दृष्टीने रोहित निकम यांची अध्यक्षपदी झालेली निवड महत्त्वपूर्ण मानली जात असून, आगामी काळात पणन महासंघाच्या माध्यमातून शेतकरी हिताच्या अधिक प्रभावी योजना व उपक्रम राबवले जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound