Home प्रशासन कर्कीतील सिमेंट काँक्रीट रस्ता नित्कृष्ट ; सार्वजनिक बांधकाम विभागावर ग्रामस्थांचा संताप

कर्कीतील सिमेंट काँक्रीट रस्ता नित्कृष्ट ; सार्वजनिक बांधकाम विभागावर ग्रामस्थांचा संताप

0
27


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील कर्की गावात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नुकत्याच करण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाच्या दर्जावर ग्रामस्थांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. पहिल्याच पावसात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्याच्या बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्याचा तसेच काम करताना तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जुन्या डांबरी रस्त्याचे आवश्यक खोदकाम आणि तांत्रिक प्रक्रिया न करता त्याच रस्त्यावर थेट सिमेंट काँक्रीटचा थर टाकण्यात आला. त्यामुळे रस्त्याची उंची वाढली असून पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी योग्य व्यवस्था करण्यात आलेली नाही. काम सुरू असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचा जबाबदार अधिकारी प्रत्यक्ष ठिकाणी उपस्थित नसल्याने ठेकेदाराने मनमानी पद्धतीने काम केल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे.

यापूर्वी जुन्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गटारे असल्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा व्यवस्थित होत होता. मात्र नवीन सिमेंट काँक्रीट रस्ता तयार करताना दोन्ही बाजूंच्या गटारांची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नसल्याने पहिल्याच पावसात रस्त्यावर पाणी तुंबले आहे. काही ठिकाणी पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे परिसरातील आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. रस्त्याचे अंदाजपत्रक तयार करताना पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था हा महत्त्वाचा तांत्रिक भाग असतो. मात्र कर्की येथील रस्त्याच्या कामात या मूलभूत बाबीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अंदाजपत्रकात दोन्ही बाजूंना गटारांची तरतूद करण्यात आली होती का? आणि जर तरतूद होती तर ती प्रत्यक्ष कामातून का वगळण्यात आली, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत संबंधित कामाची उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी करण्याची मागणी केली आहे. रस्त्याच्या कामाचे अंदाजपत्रक, मोजमाप पुस्तिका (एम.बी.) तसेच प्रत्यक्ष झालेल्या कामाची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दोषी अधिकारी आणि ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही जोर धरत आहे. कर्की गावातील नागरिकांनी सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या दोन्ही बाजूंना तातडीने गटारे बांधण्याची मागणी केली आहे. पावसाळ्यात निर्माण होणारी पाणी साचण्याची समस्या दूर करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.


Protected Content

Play sound