Home धर्म-समाज ७५ वर्षांची परंपरा असलेल्या तापी तीर-भीमातीर पंढरपूर पायी दिंडीचे अंजाळेत स्वागत

७५ वर्षांची परंपरा असलेल्या तापी तीर-भीमातीर पंढरपूर पायी दिंडीचे अंजाळेत स्वागत

0
14


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वारकरी संप्रदायाची अखंड भक्ती, परंपरा आणि श्रद्धेचा संगम असलेल्या श्रीक्षेत्र अंजाळे ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे यावल तालुक्यातील अंजाळे येथे भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. तब्बल ७५ वर्षांची परंपरा असलेल्या या तापी तीर-भीमातीर पंढरपूर पायी वारीत शेकडो वारकरी सहभागी झाले असून, संपूर्ण परिसर विठ्ठलनामाच्या गजराने भक्तिमय झाला आहे.

वारकरी संप्रदायामध्ये पंढरपूर वारीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या वारीची परंपरा वारकरी अलंकार श्री गुरु जगन्नाथ महाराज अंजाळेकर पूजनी महाराज यांनी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी म्हणजेच १९२८ सालापासून सुरू केली होती. त्यांच्या पश्चातही ही पवित्र परंपरा त्यांचे गादीपती श्री धनराज महाराज अंजाळेकर समर्थपणे पुढे नेत आहेत. दि. २३ जून रोजी श्रीक्षेत्र अंजाळे येथे जगन्नाथ महाराज अंजाळेकर संस्थानचे अध्यक्ष दीपक नरोत्तम चौधरी यांच्या हस्ते श्री महाराजांच्या पादुकांचा विधिवत अभिषेक करण्यात आला. यानंतर अंजाळे गावातून दिंडी ग्रामदैवत श्री लक्ष्मीनारायण मंदिरात दाखल झाली. तेथून पुढे श्री गुरु जगन्नाथ महाराज यांच्या वाड्यावर दिंडीचा मुक्काम झाला.

रात्रीच्या वेळी गादीपतींचे कीर्तन आयोजित करण्यात आले. कीर्तनातून वारकरी भक्तांना अध्यात्म, भक्ती आणि संत परंपरेचे महत्त्व सांगण्यात आले. दुसऱ्या दिवशी म्हणजे २४ जून रोजी सकाळी भक्तिमय वातावरणात दिंडीने पंढरपूरकडे प्रस्थान केले. या पायी दिंडी सोहळ्यात विणेकरी म्हणून श्री चिंतामण महाराज, श्री भरत महाराज म्हैसवाडीकर, शालिग्राम महाराज, जितेंद्र महाराज, संजय महाराज, सुभाष महाराज, राजू राणे यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले. संस्थेचे अध्यक्ष, विश्वस्त तसेच शेकडो वारकरी भाविकांनी या भक्तिमय सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

अंजाळे ते पंढरपूर ही वारी केवळ धार्मिक परंपरा नसून श्रद्धा, संस्कार आणि संत विचारांचा वारसा पुढे नेणारा आध्यात्मिक प्रवास आहे. गेल्या ७५ वर्षांपासून सुरू असलेल्या या दिंडी सोहळ्यामुळे परिसरातील वारकऱ्यांमध्ये भक्तीभाव अधिक दृढ होत असून, पुढील पिढीपर्यंत ही परंपरा पोहोचविण्याचे कार्य सुरू आहे. श्रीक्षेत्र अंजाळे येथून निघालेल्या या पवित्र पायी दिंडी सोहळ्याने वारकरी भक्तीचा उत्साह आणि विठ्ठलनामाचा जयघोष घेऊन पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले असून, भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.


Protected Content

Play sound