
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी लिमिटेड (ग. स. सोसायटी, जळगाव) यांच्या वतीने सेवापूर्ती सत्कार सोहळा, तैलचित्र अनावरण तसेच ऑनलाईन डिजिटल पेमेंट सुविधा प्रणालीचा शुभारंभ कार्यक्रम शुक्रवार, दि. २६ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. सहकार क्षेत्रातील या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला राज्यातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

‘विना सहकार नाही उद्धार’ या सहकाराच्या विचारधारेवर कार्यरत असलेल्या ग. स. सोसायटीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात ज्येष्ठ सभासदांचा सत्कार, सहकार गटाचे अध्यक्ष मा. उदय मधुकर पाटील यांचा सेवापूर्ती सत्कार तसेच त्यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात येणार आहे. यासोबतच संस्थेच्या आधुनिकतेच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या ऑनलाईन डिजिटल पेमेंट सुविधा प्रणालीचा शुभारंभ होणार आहे. हा कार्यक्रम छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह, महाबळ रोड, जळगाव येथे सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे आणि आमदार सत्यजीत तांबे उपस्थित राहणार आहेत. समारंभाच्या अध्यक्षस्थानी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील राहणार आहेत. सत्कार सोहळा आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार मंगेश चव्हाण, महापौर दिपमाला काळे आदी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रतिनिधी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, महानगरपालिका आयुक्त आदित्य जीवने, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर तसेच सहकार क्षेत्रातील विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीत, ईशस्तवन, दीपप्रज्वलन आणि प्रतिमापूजनाने होणार असून त्यानंतर पाहुण्यांचे स्वागत, ज्येष्ठ सभासदांचा सत्कार, उदय मधुकर पाटील यांचा सेवापूर्ती गौरव आणि तैलचित्र अनावरण करण्यात येणार आहे. यावेळी डिजिटल पेमेंट सुविधा प्रणालीचे उद्घाटन तसेच मान्यवरांचे मनोगत होणार आहे.
कार्यक्रमाच्या निमित्ताने सभासद, कर्मचारी आणि निमंत्रितांसाठी हास्य जत्रा फेम हेमंत पाटील यांचे लेखक-दिग्दर्शक डॉ. हेमंत कुलकर्णी लिखित दोन अंकी कौटुंबिक विनोदी नाटक ‘वेगळं असं काहीतरी’ सादर करण्यात येणार आहे. या नाटकात हेमंत पाटील, विपुल बाकलकर, धनंजय धनगर आदी कलाकार सहभागी होणार आहेत. ग. स. सोसायटीचे अध्यक्ष अजबसिंग सोनुसिंग पाटील यांनी सभासद, कर्मचारी आणि निमंत्रितांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. संस्थेच्या प्रगतीमध्ये सभासदांचे योगदान महत्त्वाचे असून त्यांच्या सहकार्यामुळेच विविध उपक्रम राबविता येत असल्याचे त्यांनी सांगितले.



