
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त गोदावरी हेल्थ सिटी येथे योगाभ्यास शिबिराचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. आरोग्यदायी जीवनशैली, मानसिक संतुलन आणि शारीरिक तंदुरुस्तीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी आणि वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

या योग शिबिरात योगगुरू चैतन्य क्षीरसागर तसेच योग शिक्षिका डॉ. कोमल पाटील यांनी उपस्थितांना योगाचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी विविध योगासने आणि प्राणायामाचे प्रात्यक्षिक करून दाखवत उपस्थितांकडून त्याचा सराव करून घेतला.
योगाभ्यासाच्या माध्यमातून शरीराची क्षमता वाढते, मानसिक ताण कमी होतो आणि जीवनशैलीत सकारात्मक बदल घडून येतात, याबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. योग हा केवळ व्यायाम नसून निरोगी आणि संतुलित जीवन जगण्याचा प्रभावी मार्ग असल्याचे योग प्रशिक्षकांनी सांगितले. याप्रसंगी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. नियमित योगाभ्यासामुळे व्यक्तीचे शारीरिक आरोग्य सुधारण्यासोबतच मानसिक संतुलन, कार्यक्षमता आणि सकारात्मक विचारसरणी वाढण्यास मदत होते. निरोगी आणि आनंदी जीवनाचा पाया म्हणून योगाकडे पाहिले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमात गोदावरी फाउंडेशन अंतर्गत कार्यरत सर्व वैद्यकीय सेवांशी संबंधित महाविद्यालयांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, अध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी या योग शिबिरात सहभागी झाले होते.कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी नियमित योग करण्याचा संकल्प व्यक्त केला. योगाभ्यास शिबिरामुळे विद्यार्थ्यांसह सर्व सहभागींच्या मनात योगाविषयी जागरूकता निर्माण झाली असून, दैनंदिन जीवनात योगाचा अवलंब करण्याचा संदेश देण्यात आला.



