Home Cities जळगाव महामार्गावरील ५२ अतिक्रमणधारकांना ‘नॅशनल हायवे’ची नोटीस; आठ दिवसांत स्वतःहून न हटवल्यास चालणार...

महामार्गावरील ५२ अतिक्रमणधारकांना ‘नॅशनल हायवे’ची नोटीस; आठ दिवसांत स्वतःहून न हटवल्यास चालणार बुलडोजर

0
25


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण हटवण्यासाठी अखेर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) कडक पावले उचलली आहेत. महामार्गालगत बेकायदेशीरपणे उभे राहिलेले तब्बल ५२ व्यावसायिक आणि गाळेधारकांना प्राधिकरणाकडून अधिकृत नोटीस बजावण्यात आल्या आहेत. येत्या आठ दिवसांच्या आत संबंधित अतिक्रमणधारकांनी आपले अतिक्रमण स्वतःहून काढून न घेतल्यास, त्यावर थेट बुलडोजर चालवून ते पाडण्यात येईल, असा थेट व कडक इशारा महामार्ग प्राधिकरणाने दिला आहे.

वाढत्या अपघातांमुळे महापौरांचा आक्रमक पाठपुरावा
शहरातील प्रमुख रस्त्यांच्या आणि त्यातही मुख्यत्वे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणावर पक्की व तात्पुरती अतिक्रमणे झाली आहेत. या वाढत्या अतिक्रमणामुळे शहरातील वाहतुकीला प्रचंड अडथळा निर्माण होत असून राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने गंभीर अपघातांची मालिका सुरू आहे. अनेक अपघातांमध्ये निष्पाप वाहनधारकांना गंभीर दुखापती झाल्या आहेत, तर काहींना या अतिक्रमणामुळे झालेल्या अपघातांत आपला जीवही गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर, महापौर दीपमाला काळे यांनी जळगाव शहर अतिक्रमणमुक्त रस्ते करण्याचा निर्धार केला असून, शहरातील अंतर्गत भागात महापालिकेकडून जोरदार कारवाई सुरू आहे. मात्र, महामार्गावरील अतिक्रमण काढण्याची कायदेशीर जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची असल्याने, महापौरांनी या कारवाईसाठी ‘नही’ (NHAI) च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सातत्याने आणि आक्रमकपणे पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर यश आले असून प्राधिकरणाने ५२ अतिक्रमणधारकांना आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.

महापौरांच्या चुलत भावाच्या हॉटेलवरही चालणार बुलडोजर
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ज्या ५२ जणांना नोटीस बजावली आहे, त्यामध्ये शहरातील अनेक मोठ्या नामांकित व्यावसायिक प्रतिष्ठानांचा समावेश आहे. या कारवाईच्या कक्षेत आदित्य फार्म, रेमंड कंपनी, बजाज शोरूम, नागोरी चहा, विकास गोल्ड, काशिनाथ लॉज, होंडा शोरूम, प्रभात रेस्टॉरंट, खान्देश सिरॅमिक, ओला शोरूम आणि रॉयल फर्निचर या मोठ्या नावांसह इतर लहान-मोठ्या ५२ व्यावसायिकांचे बेकायदेशीर गाळे, वॉल कंपाऊंड, पक्के बांधकाम, पत्र्याचे शेड आणि पानटपऱ्या जमीनदोस्त केल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे, शहरात अतिक्रमण काढताना कोणताही राजकीय भेदभाव केला जात नसल्याचे या कारवाईतून अधोरेखित होत आहे; कारण या यादीमध्ये स्वतः महापौर दीपमाला काळे यांच्या चुलत बंधूंच्या ‘काशिनाथ लॉज’च्या बेकायदेशीर कंपाऊंड वॉलचाही समावेश असून त्यावरही प्रशासनाचा बुलडोजर चालणार आहे. प्राधिकरणाच्या या धडक मोहिमेमुळे महामार्गावरील बड्या अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहेत.


Protected Content

Play sound