Home क्राईम प्लास्टिक भंगाराला भीषण आग ; एमआयडीसी अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

प्लास्टिक भंगाराला भीषण आग ; एमआयडीसी अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

0
7


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव टोल नाका पुढे नीलंबरी हॉटेलजवळील प्लास्टिक भंगार दुकानातील वेस्ट मटेरियलला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना १९ जून रोजी घडली. आगीची माहिती मिळताच महानगरपालिका आणि एमआयडीसी अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अथक प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

याबाबत एमआयडीसी अग्निशमन उपकेंद्र येथे आरिफ खाटीक यांनी स्वतः येऊन माहिती दिली की, जळगाव टोल काटा पुढे नीलंबरी हॉटेलजवळ असलेल्या प्लास्टिक भंगार दुकानातील वेस्ट मटेरियल आणि भंगाराला अचानक मोठी आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच महानगरपालिकेच्या गोलाणी मुख्य अग्निशमन केंद्रासह एमआयडीसी अग्निशमन उपकेंद्र, महाबळ अग्निशमन उपकेंद्र आणि छत्रपती शिवाजीनगर अग्निशमन उपकेंद्रातील कर्मचारी तातडीने घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर आगीची तीव्रता लक्षात घेऊन अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरित बचावकार्य सुरू केले. प्लास्टिक भंगार आणि ज्वलनशील साहित्यामुळे आग वेगाने पसरत होती. मात्र अग्निशमन कर्मचाऱ्यांनी शिताफीने पाण्याचा मारा करत काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले.

या कारवाईत अग्निशमन अधिकारी अश्वजीत घरडे यांच्या मार्गदर्शनाखाली फायरमन योगेश कोल्हे, वाहनचालक युसूफ पटेल, प्रकाश चव्हाण, मयूर ओतारी, फायरमन राकेश सोनवणे, योगेश पाटील, संजय तायडे, नितीन ससाने तसेच इतर अग्निशमन कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आगीचे स्वरूप मोठे असल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र अग्निशमन दलाच्या जलद प्रतिसादामुळे आग पसरू न देता आटोक्यात आणण्यात यश आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी भंगार साहित्याचे नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound