
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सोनी नगर परिसरात गटार व्यवस्था नसल्यामुळे सांडपाणी साचून डासांची मोठ्या प्रमाणावर उत्पत्ती होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. परिसरातील नागरिकांनी जळगाव महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांच्याकडे निवेदन देत तातडीने गटार व्यवस्था उभारावी, साचलेल्या पाण्याचा निचरा करावा तसेच डास नियंत्रणासाठी फवारणी करावी, अशी मागणी केली आहे. सोनी नगरातील पहिल्या गल्लीमध्ये अद्याप गटार व्यवस्था उपलब्ध नसल्याने परिसरातील सांडपाण्याचा योग्य निचरा होत नसल्याचे नागरिकांनी निवेदनात म्हटले आहे. सध्या गटारीचे सांडपाणी पाईपद्वारे एका खुल्या खाजगी प्लॉटमध्ये सोडण्यात येत असून, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

साचलेल्या पाण्यामुळे परिसरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होत असून, नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. नागरिक नियमितपणे महानगरपालिकेचे कर भरत असतानाही मूलभूत नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
सोनी नगर परिसरात तातडीने गटार व्यवस्था तयार करावी, साचलेल्या सांडपाण्याचा निचरा करावा तसेच डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषध फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. याबाबत महानगरपालिका प्रशासनाने त्वरित दखल घेऊन कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या निवेदनावर विकास कुमार जहाँगीर, धनराज कुंभार, दीपक शिंपी, चंद्रकांत जोशी, गोपाल तायडे आदी नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. नागरिकांनी प्रशासनाकडे आरोग्याच्या दृष्टीने ही समस्या तातडीने सोडविण्याची मागणी केली आहे.



