Home Cities अमळनेर महापुरुषांच्या फलकावर जाहिरात लावल्याचा आरोप ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

महापुरुषांच्या फलकावर जाहिरात लावल्याचा आरोप ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

0
9


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील ढेकू परिसर येथील राजर्षी शाहू महाराज सर्कल येथे लावण्यात आलेल्या राजर्षी शाहू महाराज यांच्या फलकावर अनधिकृतपणे जाहिरात फलक लावल्याचा आरोप करत रिलायन्स जिओ स्मार्ट बाजार, अमळनेर शाखेविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत राजमुद्रा फाउंडेशनचे अध्यक्ष शाम जयवंतराव पाटील यांनी संबंधित कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे निवेदन प्रशासनाकडे दिले आहे.

बहुजन समाजाला न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी कार्य करणारे तसेच सामाजिक न्याय आणि आरक्षणाच्या इतिहासातील महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व असलेल्या राजर्षी शाहू महाराज यांचा फलक राजमुद्रा फाउंडेशनच्या वतीने मागील १० वर्षांपासून राजर्षी शाहू महाराज सर्कल येथे लावण्यात आला आहे. मात्र, मागील १५ दिवसांपासून या फलकावर रिलायन्स जिओ स्मार्ट बाजार, अमळनेर यांनी अनधिकृतपणे जाहिरात फलक लावल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. या प्रकारामुळे राजर्षी शाहू महाराज यांचा अवमान झाला असून, तमाम बहुजन समाजाच्या भावना दुखावल्याचा दावा राजमुद्रा फाउंडेशनकडून करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित कंपनीच्या अमळनेर शाखेविरोधात तातडीने गुन्हा दाखल करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

राजमुद्रा फाउंडेशनचे अध्यक्ष शाम जयवंतराव पाटील यांनी दिलेल्या निवेदनात सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेल्या महापुरुषांच्या स्मृतीचिन्हांचा आणि फलकांचा आदर राखणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. तसेच अशा प्रकारच्या घटनांमुळे सामाजिक भावना दुखावल्या जाऊ शकतात, त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी अमळनेर तालुका मराठा समाजाचे संचालक संजय पाटील, भारतीय जनता पक्षाचे अमळनेर शहराध्यक्ष योगेश महाजन, शिवसेना कार्यकर्ते सुरज परदेशी, हर्षल महाजन, अनिरुद्ध शिसोदे, शुभम पवार आदी उपस्थित होते. दरम्यान, या प्रकरणामुळे अमळनेर शहरात चर्चेला उधाण आले असून, प्रशासन या तक्रारीवर कोणती भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. महापुरुषांच्या स्मारक आणि फलकांबाबत योग्य ती काळजी घेण्याची मागणी विविध स्तरातून होत आहे.


Protected Content

Play sound