Home Cities जळगाव नीट (UG) परीक्षा २१ जून रोजी ; १२ केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्था,...

नीट (UG) परीक्षा २१ जून रोजी ; १२ केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्था, १०० मीटर परिसरात प्रवेशबंदी

0
49


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET UG) २१ जून २०२६ रोजी जळगाव जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आली आहे. परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार होऊ नये तसेच परीक्षा प्रक्रिया शांततेत व पारदर्शक पद्धतीने पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष उपाययोजना केल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर ‘कॉपीमुक्त अभियान’ राबविण्यात येणार आहे.

जळगाव जिल्ह्यात नीट (यूजी) परीक्षेसाठी एकूण १२ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या परीक्षा केंद्रांवर मोठ्या संख्येने विद्यार्थी परीक्षा देणार असून, परीक्षा काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी घेण्यात आली आहे. परीक्षा केंद्र परिसरात कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये तसेच शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन अपर जिल्हादंडाधिकारी वैशाली चव्हाण यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

या आदेशानुसार, २१ जून रोजी परीक्षा सुरू झाल्यापासून परीक्षा संपेपर्यंत सर्व परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात कोणत्याही व्यक्तीला प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, परीक्षार्थी, परीक्षा केंद्रावर नियुक्त अधिकारी-कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड यांना या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.याशिवाय परीक्षा केंद्रांच्या ५०० मीटर परिसरातील सर्व झेरॉक्स दुकानेही परीक्षा कालावधीत बंद ठेवण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. परीक्षेतील गोपनीयता कायम राखण्यासाठी आणि कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रशासनाने जारी केलेला आदेश तातडीच्या परिस्थितीमुळे एकतर्फी लागू करण्यात आला असून, त्याचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग आणि संबंधित यंत्रणांकडून समन्वयाने काम केले जाणार आहे. नीट (यूजी) परीक्षा २१ जून रोजी जळगाव जिल्ह्यातील १२ केंद्रांवर होणार असून, परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात प्रवेशबंदी आणि ५०० मीटर परिसरातील झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णयामुळे प्रशासनाने सुरक्षित आणि कॉपीमुक्त परीक्षेसाठी कडक नियोजन केले आहे.


Protected Content

Play sound