Home Cities जळगाव जळगावात उद्यापासून श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाला प्रारंभ

जळगावात उद्यापासून श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाला प्रारंभ

0
60

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील लक्ष्मी नगर परिसरात (एम.जे. कॉलेजच्या मागे, वैशाली अपार्टमेंटजवळ) शुक्रवार, दि. १९ जून २०२६ पासून भव्य ‘संगीतमय श्रीमद् भागवत कथा’ आणि ‘अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्यात बीड जिल्ह्यातील श्रीमंत महादुर्ग किल्लेधारूर येथील भागवताचार्य श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्य श्री श्री हरिहरानंद भारती स्वामीजी यांच्या सुश्राव्य वाणीतून श्रीमद् भागवत कथेचे रसाळ निरूपण होणार आहे.

दि. १९ जून ते २६ जून २०२६ या कालावधीत चालणाऱ्या या सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भागवत कथा, हरिपाठ, काकड आरती तसेच रात्री होणाऱ्या कीर्तन सेवेमुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे. भाविकांसाठी हा आध्यात्मिक पर्वणीचा सोहळा ठरणार आहे.

सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रमांची सुरुवात पहाटे ५:३० ते ६:३० या वेळेत काकड आरतीने होईल. त्यानंतर दुपारी १ ते ४ या वेळेत श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात येणार आहे. सायंकाळी ५:३० ते ६:३० या वेळेत हरिपाठ होईल, तर रात्री ८ ते १० या वेळेत नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तन सेवेचा लाभ भाविकांना घेता येणार आहे.

सप्ताहाच्या कालावधीत दररोज रात्री होणाऱ्या कीर्तन सेवेसाठी विविध नामवंत कीर्तनकार व भजनी मंडळांची उपस्थिती राहणार आहे. शुक्रवार, दि. १९ जून रोजी खाटूश्याम भजन सेवा दिपक प्रजापती यांच्या माध्यमातून होईल. शनिवार, दि. २० जून रोजी ह.भ.प. मोहनदास महाराज, रविवार, दि. २१ जून रोजी ह.भ.प. अनिल महाराज (एकलग्न), सोमवार, दि. २२ जून रोजी ह.भ.प. देवगोपाल शास्त्री महाराज (आडगाव) यांचे कीर्तन होणार आहे.

मंगळवार, दि. २३ जून रोजी सुंदर कांडाचे आयोजन करण्यात आले असून सुनय जोशी सेवा देतील. बुधवार, दि. २४ जून रोजी ह.भ.प. राधेश्याम महाराज (येवला), गुरुवार, दि. २५ जून रोजी ह.भ.प. परमेश्वर उगले महाराज यांचे कीर्तन होईल. शुक्रवार, दि. २६ जून रोजी ह.भ.प. श्री योगी दत्तानाथ महाराज (शिवखेडा) यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे.

या धार्मिक सोहळ्यानिमित्त गुरुवार, दि. २५ जून रोजी सायंकाळी ६ वाजता भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच शुक्रवार, दि. २६ जून रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

या सप्ताहात ‘जगद्गुरु तुकोबाराय वारकरी शिक्षण संस्था’ (एकलग्न, ता. धरणगाव, जि. जळगाव) हे भजनी मंडळ म्हणून सेवा देणार आहे. गायनाचार्य म्हणून मयुर महाराज (तरवाडे) व ईश्वर महाराज (हातनूर), तर मृदंगाचार्य म्हणून मयुर महाराज (खापरखेडा) आपली सेवा बजावणार आहेत.

या धार्मिक सोहळ्याचे आयोजन प्रतिभा ध्रुवराज वारके, पौर्णिमा मनोज वारके, सेजल, भूमी व समस्त वारके परिवार (साकरी) यांच्या वतीने करण्यात आले आहे. जळगाव शहरातील तसेच परिसरातील सर्व भाविकांनी श्रीमद् भागवत कथा, कीर्तन सेवा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 


Protected Content

Play sound