Home क्राईम कोळन्हावी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू ; गुन्हा दाखल

कोळन्हावी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू ; गुन्हा दाखल

0
27


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील कोळन्हावी येथील २४ वर्षीय तरुणाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. कोळन्हावी-डांभुर्णी रस्त्यावर रात्रीच्या सुमारास झालेल्या या अपघातात तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी यावल पोलिसात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत यावल पोलिसात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार, कोळन्हावी येथील पवन रवींद्र कोळी (वय २४) हा १८ जून रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास कोळन्हावी-डांभुर्णी रस्त्यावरील पाटाच्या चारीजवळ लघुशंकेसाठी थांबला होता. याचवेळी मागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. या अपघातात पवन कोळी यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. घटनेनंतर त्यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीअंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी तुषार सोनवणे यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले. या घटनेची माहिती मिळताच यावल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा शोध सुरू केला आहे. याबाबत कोळन्हावी येथील उमेश दिलीप परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०६ (१), २८१, १२५ (ए), १२५ (बी) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १३४ यासह अन्य संबंधित कलमांनुसार कारवाई सुरू केली आहे. या अपघातामुळे कोळन्हावी परिसरात हळहळ व्यक्त होत असून, घटनेबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास यावल पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार वसंत बेलदार करीत आहेत. अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत.


Protected Content

Play sound