Home प्रशासन मराठी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी संतोष शेलोडे

मराठी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी संतोष शेलोडे

0
14

भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मराठी पत्रकार संघाच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी भुसावळ येथील ‘खान्देश लाईव्ह न्यूज’चे संपादक संतोष खंडू शेलोडे यांची निवड करण्यात आली आहे. पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव, संघटन कौशल्य आणि पत्रकारांच्या प्रश्नांबाबत असलेली संवेदनशीलता लक्षात घेऊन त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे जळगाव जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुंबई येथे ९ जून रोजी संपन्न झालेल्या मराठी पत्रकार संघाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात संतोष शेलोडे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी, उपाध्यक्ष विवेक इनामदार, प्रदेश सचिव हरीभाऊ प्रक्षाळे तसेच प्रदेश संघटक संदीप पारोळेकर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांसह राज्यभरातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यस्तरीय अधिवेशनाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच प्रसिद्ध प्रेरणादायी वक्ते स्वामी गौर गोपाल दास यांचा समावेश होता. पत्रकारिता, समाजप्रबोधन आणि संघटनात्मक कार्य या विषयांवर अधिवेशनात विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. संतोष शेलोडे यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात सातत्यपूर्ण आणि प्रभावी कामगिरी केली आहे. स्थानिक प्रश्नांना वाचा फोडण्याबरोबरच सामाजिक विषयांवरही त्यांनी सातत्याने लेखन केले आहे. पत्रकारितेतील त्यांचे योगदान आणि संघटनात्मक कार्याचा अनुभव लक्षात घेऊन मराठी पत्रकार संघाने त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड केल्याचे सांगण्यात आले.

या अधिवेशनासाठी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून पत्रकार प्रतिनिधी सहभागी झाले होते. भुसावळ येथून पत्रकार कमलेश चौधरी, श्याम गोविंदा, वसंत कोलते, विनोद गोरधे आणि किशोर सावळे यांनी उपस्थिती दर्शवून कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी पत्रकारांमधील एकोपा, व्यावसायिक विकास आणि बदलत्या माध्यमविश्वातील आव्हानांवरही चर्चा करण्यात आली. नियुक्तीनंतर बोलताना संतोष शेलोडे यांनी पत्रकारांच्या सर्वांगीण विकासासाठी प्राधान्याने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. पत्रकारांच्या समस्या, हक्क आणि सुरक्षा यासंदर्भातील प्रश्न प्रभावीपणे मांडले जातील तसेच पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध संघटनेच्या माध्यमातून ठामपणे आवाज उठविला जाईल, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील पत्रकारांना संघटित करून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


Protected Content

Play sound