जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । एमबीबीएस पदवी परीक्षेत प्रथम श्रेणी मिळवत डॉ. ओवैस अशफाक बगवान यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच समाजबांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
वैद्यकीय शिक्षणासारख्या आव्हानात्मक क्षेत्रात प्रथम श्रेणी मिळवणे ही मोठी कामगिरी मानली जाते. डॉ. ओवैस यांनी कठोर परिश्रम, चिकाटी आणि अभ्यासातील सातत्य यांच्या जोरावर हे यश मिळवले आहे. त्यांच्या यशामागे वडील अशफाक निसार प्यारजी बगवान यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि त्याग यांचा मोलाचा वाटा असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

तसेच आजोबा निसार प्यारजी बगवान यांनी दिलेले संस्कार, प्रेरणा आणि आशीर्वाद हेही या यशामागील महत्त्वाचे आधारस्तंभ ठरले आहेत. या यशाबद्दल कुटुंबीयांनी अल्लाहचे आभार मानत मेहनत आणि प्रार्थनांचे फळ मिळाल्याची भावना व्यक्त केली.
डॉ. ओवैस यांच्या यशामुळे संपूर्ण कुटुंबाचा गौरव वाढला असून नातेवाईक, मित्रमंडळी आणि शुभेच्छुकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करून समाजसेवेचे व्रत जोपासावे आणि यशाची नवी शिखरे सर करावीत, अशा सदिच्छाही व्यक्त करण्यात आल्या. यशप्राप्तीनिमित्त डॉ. ओवैस अशफाक बगवान आणि त्यांच्या कुटुंबीयांनी शुभेच्छा, प्रेम आणि आशीर्वाद देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.



