पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तहसील प्रशासनाच्या विशेष टास्क फोर्सने अवैध वाळू वाहतुकीविरोधात धडक कारवाई करत चार डंपर जप्त केले. उपविभागीय अधिकारी भुषण अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली व तहसीलदार विजय बनसोडे यांच्या नेतृत्वात १० जूनच्या रात्री डोकलखेडा परिसरात ही कारवाई करण्यात आली.
महसूल व पोलिस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे चार डंपर ताब्यात घेऊन तहसील कार्यालयात जमा केले. या मोहिमेत २३ सदस्यांच्या विशेष पथकाने सहभाग घेतला. मंडळ अधिकारी आर. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली महसूल व पोलिस कर्मचाऱ्यांनी समन्वयाने ही कारवाई यशस्वी केली.

अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधातील कारवाया यापुढेही सुरू राहणार असून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले असून परिसरात प्रशासनाच्या धडक मोहिमेची चर्चा रंगली आहे.



