Home क्राईम एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; २१ लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह २८ लाखांचा मुद्देमाल जप्त

एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; २१ लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह २८ लाखांचा मुद्देमाल जप्त

0
1


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे कडक आदेश दिले आहेत. या आदेशाचे तंतोतंत पालन करत एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी जळगाव शहरात एक मोठी धडक कारवाई केली आहे. जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गावर सापळा रचून पोलिसांनी एका चारचाकी मालवाहू वाहनातून गुपचूप वाहतूक केला जाणारा तब्बल २१ लाख ८१ हजार ६०० रुपये किमतीचा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला सुगंधित विमल पानमसाला व गुटखा जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी वाहनासह एकूण २८ लाख ८१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून एका संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

या धडक कारवाईबाबतची सविस्तर माहिती अशी की, दिनांक ९ जून २०२६ रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना एका गोपनीय माहितीदाराकडून अत्यंत महत्त्वाची बातमी मिळाली होती. जळगाव शहरातील महामार्गावरून महाराष्ट्र राज्यात पूर्णपणे प्रतिबंधित असलेला गुटखा घेऊन एक चारचाकी मालवाहू वाहन मोठ्या प्रमाणावर वाहतूक करत जाणार आहे, अशी अचूक माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, सफौ विजयसिंग पाटील, पोलीस अंमलदार गिरीश पाटील आणि प्रमोद लाडवंजारी यांचे एक विशेष पथक नेमले. या पथकाला आवश्यक त्या सूचना देऊन तातडीने कारवाईसाठी रवाना करण्यात आले.

मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी जळगाव शहरातील मुख्य महामार्गावरील अजिंठा चौक ते इच्छादेवी चौक दरम्यान असलेल्या जिओ पेट्रोल पंपाच्या परिसरात अत्यंत शिताफीने सापळा रचला. काही वेळातच पोलिसांना त्या ठिकाणी एक संशयित पांढऱ्या रंगाचे चारचाकी मालवाहू वाहन येताना दिसले. पोलिसांनी प्रसंगावधान राखून ते वाहन थांबवले. पोलीस पथकाने वाहन चालकाला वाहनामध्ये काय सामान भरलेले आहे, याबाबत विचारपूस केली असता त्याने पोलिसांना उडवाउडवीची आणि संशयास्पद उत्तरे देण्यास सुरुवात केली. वाहन चालकाचा संशयास्पद वावर पाहून पोलीस पथकाने तात्काळ संपूर्ण वाहनाची कसून तपासणी केली असता, त्या वाहनामध्ये महाराष्ट्र राज्यात विक्री, वाहतूक व साठवणुकीसाठी पूर्णपणे प्रतिबंधित असलेला सुगंधित विमल पानमसाला आणि अन्नपदार्थांचा मोठा साठा आढळून आला.

पोलिसांनी तात्काळ या घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली आणि अन्न व औषध प्रशासन (FDA) महाराष्ट्र राज्य, जळगाव विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांनाही तात्काळ घटनास्थळावर बोलावून घेतले. पोलिसांनी संशयित वाहन चालकाचे नाव आणि गाव विचारले असता, त्याने त्याचे नाव जोगेंद्र भिका पाटील (रा. फुलपाट, ता. धरणगाव, जि. जळगाव) असे सांगितले. पोलिसांनी त्याच्या ताब्यात असलेल्या महिंद्रा कंपनीच्या पांढऱ्या रंगाच्या बोलेरो पिकअप मालवाहू वाहनाची (नोंदणी क्रमांक MH 19 CX 3280) तपासणी केली असता, त्यामध्ये २१ लाख ८१ हजार ६०० रुपये किमतीच्या प्रतिबंधित विमल सुगंधित गुटखा व पानमसाला असलेल्या एकूण ५८ गोण्या मिळून आल्या. तसेच गुटख्याची वाहतूक करण्यासाठी वापरलेले ७ लाख रुपये किमतीचे बोलेरो वाहन असा एकूण २८ लाख ८१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये संशयित आरोपी जोगेंद्र भिका पाटील याच्याविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ मधील कलम २६(२), ३०(अ), २६(२)(४) सहवाचन अन्न सुरक्षा आयुक्त यांचे दिनांक १६ जुलै २०२५ च्या शासन राजपत्र आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी तसेच भारतीय न्यायसंहिता (BNS) नुसार कलम १२३, २७५, २७४, २२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके व पोलीस अंमलदार योगेश घुगे हे करत आहेत. सदरची यशस्वी कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित, पोलीस उपअधिक्षक  नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी श्री. संतोष कांबळे (सहाय्यक आयुक्त), आकांक्षा खालकर, अमोल जगताप, योगराज सूर्यवंशी आणि पत्मजा कठरे यांच्या संयुक्त पथकाने केली आहे.


Protected Content

Play sound