Home पर्यावरण राज्यात 15 जूनपर्यंत मान्सूनची मंद वाटचाल ; शेतकऱ्यांना पेरणीची घाई टाळण्याचे आवाहन

राज्यात 15 जूनपर्यंत मान्सूनची मंद वाटचाल ; शेतकऱ्यांना पेरणीची घाई टाळण्याचे आवाहन

0
9


मुंबई – वृत्तसेवा । राज्यात मान्सूनने दक्षिण कोकणात प्रवेश केला असला तरी त्याचा वेग आणि प्रभाव अपेक्षित प्रमाणात दिसून येत नसल्याने किमान 15 जूनपर्यंत राज्यभर समाधानकारक पावसाची शक्यता कमी असल्याचे हवामान विभागाच्या अंदाजातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करता परिस्थितीचा आढावा घेऊनच पुढील निर्णय घ्यावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून सध्या दक्षिण कोकणातील काही भागांपर्यंत पोहोचला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र त्यानंतर मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावण्याची शक्यता असून राज्यातील बहुतांश भागात पावसाची तीव्रता कमी राहण्याचा अंदाज आहे. सध्याच्या हवामान परिस्थितीनुसार विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन मेघगर्जनेसह विखुरलेल्या स्वरूपाचा वादळी पाऊस पडू शकतो. तथापि, हा पाऊस व्यापक स्वरूपाचा नसून शेतीच्या पेरणीसाठी आवश्यक असलेल्या सातत्यपूर्ण आणि समाधानकारक पावसाची स्थिती अद्याप निर्माण झालेली नाही.

दरम्यान, राज्यातील अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. किमान 12 जूनपर्यंत विदर्भ आणि खानदेशातील कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे राहण्याचा अंदाज असून मराठवाड्यात तापमान 35 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान राहू शकते. त्यामुळे उष्णतेचा त्रास कायम राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने शेतकरी व नागरिकांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. वादळी पावसाच्या एक-दोन सरींवर विश्वास ठेवून पेरणी करू नये, कारण पुढील काही दिवस पावसात खंड पडण्याची शक्यता आहे. तसेच मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली, टिनशेडखाली किंवा वीज वाहिन्या, ट्रान्सफॉर्मर आणि खांबांच्या परिसरात थांबणे टाळावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound