
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पर्यावरण संरक्षण, इंधन बचत आणि शाश्वत विकासाचा संदेश देत जळगावातील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने दैनंदिन कामकाजात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर सुरू करून एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या पर्यावरणपूरक जीवनशैलीच्या आवाहनाला प्रतिसाद देत संस्थेने डिझेल वाहनांऐवजी इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब केला असून, त्यामुळे इंधन खर्चात मोठी बचत होत असल्याचे दिसून येत आहे.

महाविद्यालय आणि रुग्णालय परिसरात विविध विभागांदरम्यान अधिकारी, कर्मचारी तसेच आवश्यक कागदपत्रांची नियमित वाहतूक करण्यासाठी यापूर्वी डिझेल वाहनांचा वापर केला जात होता. मात्र वाढत्या इंधन दरांचा आर्थिक भार आणि पर्यावरणावर होणारा परिणाम लक्षात घेऊन संस्थेच्या प्रशासनाने पर्यायी ऊर्जा स्रोतांचा वापर करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार इलेक्ट्रिक वाहन सेवेला प्राधान्य देण्यात आले.
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न रुग्णालयाचा विस्तीर्ण परिसर असल्यामुळे विविध विभागांमध्ये सतत ये-जा करावी लागते. या गरजा लक्षात घेऊन इलेक्ट्रिक वाहनांचा वापर अधिक सोयीस्कर, जलद आणि किफायतशीर ठरत आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रवासाबरोबरच आवश्यक साहित्य, कागदपत्रे आणि प्रशासकीय कामांसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या वाहतुकीसाठीही या वाहनाचा प्रभावी वापर केला जात आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरामुळे डिझेलवरील अवलंबित्व कमी झाले असून संस्थेच्या खर्चात लक्षणीय बचत होत आहे. त्याचबरोबर कार्बन उत्सर्जनात घट होऊन पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागत आहे. ऊर्जा कार्यक्षमतेला चालना देत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर संस्थेचा भर असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
गेल्या काही वर्षांपासून संस्था विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबवत असून हरित कॅम्पस, ऊर्जा बचत आणि स्वच्छ पर्यावरण यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर हा त्या उपक्रमांचाच एक भाग असून पर्यावरण संरक्षणाबाबत समाजात जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्नही यामागे आहे. शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील संस्थांनी पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यास त्याचा सकारात्मक परिणाम समाजावर होऊ शकतो. डॉ. उल्हास पाटील संस्थेच्या या निर्णयामुळे इतर शैक्षणिक संस्था, रुग्णालये आणि औद्योगिक आस्थापनांनाही प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.



