Home प्रशासन सावदा नालाबंदी प्रकरण तापले ; बेकायदेशीर ले-आऊट मंजुरीवर कारवाईची माजी नगराध्यक्ष राजेश...

सावदा नालाबंदी प्रकरण तापले ; बेकायदेशीर ले-आऊट मंजुरीवर कारवाईची माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांची मागणी

0
21


सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सावदा ते फैजपूर राज्य मार्गालगत असलेल्या नैसर्गिक गावनाल्याची बेकायदेशीरपणे बंदी करून त्याठिकाणी ले-आऊट मंजूर करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक राजेश गजानन वानखेडे यांनी प्रांताधिकारी बबनराव काकडे यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात सावदा-फैजपूर मार्गावरील हॉटेल मनाली परिसरालगत पूर्वापार अस्तित्वात असलेल्या मोठ्या नैसर्गिक गावनाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. महसूल विभागाच्या अधिकृत नोंदींमध्येही या नाल्याची नोंद असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सातपुडा पर्वतरांगांमधून उगम पावणारा हा नाला सुमारे ११ किलोमीटर अंतरावरून वाहत येत पुढे १० किलोमीटरपेक्षा अधिक अंतर पार करतो. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह असल्याने अनेकदा पूरस्थिती निर्माण होत असल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

मात्र, गेल्या काही वर्षांत काही भू-माफियांनी संबंधित परिसरातील जमिनी खरेदी करून कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. गट क्रमांक १३५ मध्ये मूळ नाल्याचे स्वरूप बदलण्यात आले असून २७ ते २८ फूट रुंदीचा नैसर्गिक नाला नामशेष करून त्याऐवजी अवघे २ ते ३ फूट रुंदीचे सिमेंट गटार उभारण्यात आल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. त्यानंतर बिनशेती परवानगी घेऊन त्या जागेवर ले-आऊट मंजूर करण्यात आल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.

या प्रकारामुळे सुगंगानगरसह परिसरातील नागरिक, वाहनचालक, शालेय विद्यार्थी आणि पालकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे वानखेडे यांनी म्हटले आहे. पावसाळ्यात नाल्याचे पाणी रस्त्यांवर आणि निवासी भागात साचून जनजीवन विस्कळीत झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यावेळी तहसीलदार, प्रांताधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच नगरपरिषद अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून नालाबंदीमुळेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचे मान्य केल्याचा दावाही निवेदनात करण्यात आला आहे.

नगरपरिषद आणि नगरभूमापक कार्यालयाने या गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत, संपूर्ण प्रक्रिया जुन्या २०१६ सालच्या मोजणी पत्रकाच्या आधारे राबविण्यात आल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यामुळे नैसर्गिक जलप्रवाह बाधित झाला असून भविष्यात मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

राजेश वानखेडे यांनी नैसर्गिक जलप्रवाहात अडथळा निर्माण करणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याचे सांगत संबंधितांवर भारतीय नागरी संहितेच्या कलम १५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच संबंधित ले-आऊटची मंजुरी तात्काळ रद्द करावी आणि भविष्यात होणाऱ्या संभाव्य जीवितहानी व आर्थिक नुकसानीसाठी जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

दरम्यान, या निवेदनामुळे सावदा परिसरात नालाबंदीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. पावसाळ्याच्या तोंडावर हा प्रश्न ऐरणीवर आल्याने नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासन या प्रकरणाची चौकशी करून कोणती भूमिका घेते आणि संबंधितांवर काय कारवाई करते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound