
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील गजबजलेल्या रामानंद नगर रस्त्यावर बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगा चालवत असलेल्या कारने नऊ जणांना उडविले असून यातील जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, गाडी चालवत असलेला मुलगा घटनास्थळावरून पसार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.

जळगाव शहरात काल रात्री आठ वाजेच्या सुमारास थरारक घटना घडली. यात सुमारे पंधरा वर्षांचा अल्पवयीन मुलगा प्रचंड वेगाने कार चालवत रामानंद नगरकडून काव्य रत्नावली चौकाच्या दिशेने आला. चचर्जवळ येताच त्याचे कारवरील नियंत्रण सुटले. यामुळे भरधाव वेगात असलेल्या कारने रस्त्यावरील नऊ जणांना उडविली. काही क्षणातच ही घटना घडली. यानंतर कार रस्त्याच्या बाजूला जाऊ धडकत बंद पडली. यानंतर कारमधील अल्पवयीन चालक मुलाने घटनास्थळावरून पळ काढला.
दरम्यान, या भयंकर घटनेमुळे मोठा आवाज होताच परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन जखमींना रूग्णालयात दाखल केले. दरम्यान, एमएच १५ एफटी ७२०१ या क्रमांकाच्या कारचे देखील या अपघातात पुढील भाग तुटल्याने मोठे नुकसान झाले आहे. रात्री उशीरापर्यंत या प्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. तर, या अपघातात दोन दाम्पत्यासह नऊ जण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.



