Home Cities जळगाव ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जळगाव पोलिसांचा अभिनव पुढाकार 

ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जळगाव पोलिसांचा अभिनव पुढाकार 

0
19


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तसेच त्यांच्या सुरक्षितता, सन्मान आणि कल्याणासाठी जळगाव पोलिसांनी एक अभिनव उपक्रम राबवत पोलीस अधीक्षक कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांची विशेष संवाद बैठक आयोजित केली. जिल्ह्यात प्रथमच अशा स्वरूपाचा उपक्रम राबविण्यात आल्याने उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी त्याचे स्वागत करत समाधान व्यक्त केले.

या बैठकीदरम्यान पोलीस अधीक्षकांनी ज्येष्ठ नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या दैनंदिन जीवनातील विविध समस्या, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेतल्या. एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा, मालमत्तेसंबंधी वाद, कौटुंबिक प्रश्न, आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थिती, फसवणुकीचे वाढते प्रकार तसेच सार्वजनिक सेवांचा लाभ घेताना येणाऱ्या अडचणी यासह विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. परिसरातील सुरक्षाविषयक मुद्द्यांवरही ज्येष्ठ नागरिकांनी आपली मते आणि सूचना मांडल्या.

सध्याच्या डिजिटल युगात वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर बैठकीत विशेष जनजागृती करण्यात आली. बँक अधिकारी, पोलीस अधिकारी किंवा सरकारी अधिकारी असल्याचे भासवून करण्यात येणारी फसवणूक, केवायसी अपडेटच्या नावाखाली होणारे प्रकार, ओटीपी मागवून बँक खात्यातील रक्कम काढून घेणे, यूपीआय आणि क्यूआर कोडच्या माध्यमातून होणारी आर्थिक फसवणूक, बनावट गुंतवणूक योजना, डिजिटल अरेस्ट, सोशल मीडियावरील भ्रामक संदेश तसेच ऑनलाइन खरेदीतील फसवणुकीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

ज्येष्ठ नागरिकांनी कोणत्याही अनोळखी व्यक्तीला बँक खाते, एटीएम कार्ड, ओटीपी, पासवर्ड किंवा वैयक्तिक माहिती देऊ नये, संशयास्पद फोन कॉल किंवा संदेशांवर विश्वास ठेवू नये तसेच कोणतीही फसवणूक झाल्याचा संशय आल्यास तात्काळ पोलीस किंवा सायबर हेल्पलाईनशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

बैठकीत घरफोडी, चोरी, मालमत्तेची फसवणूक आणि बनावट ओळख सांगून होणाऱ्या गुन्ह्यांपासून बचाव करण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. घरगुती मदतनीस, केअरटेकर किंवा अन्य सेवांसाठी काम करणाऱ्या व्यक्तींची पोलीस पडताळणी करण्याचे महत्त्व, शेजाऱ्यांशी आणि स्थानिक पोलिसांशी सातत्याने संपर्क ठेवणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत कशी मिळवावी यासंदर्भातही माहिती देण्यात आली.

पोलीस अधीक्षकांनी आपल्या मनोगतात ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे अनुभवसंपन्न आणि मार्गदर्शक आधारस्तंभ असल्याचे सांगितले. त्यांच्या सुरक्षिततेची आणि सन्मानाची जबाबदारी समाजासह पोलिसांचीही असल्याचे नमूद करत जळगाव पोलिसांकडून त्यांच्या समस्या संवेदनशीलतेने हाताळल्या जातील आणि आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. पोलिसांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाल्याने त्यांच्या मनातील अनेक प्रश्न, समस्या आणि सूचना मांडता आल्या. पोलिसांनी घेतलेल्या या लोकाभिमुख पुढाकारामुळे सुरक्षिततेची भावना अधिक बळकट झाली असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.


Protected Content

Play sound