
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यात अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कठोर भूमिका घेत खुल्या स्वरूपात विक्रीस ठेवलेले खाद्यतेल आणि मानकांबाह्य विनापरवाना शीतपेयांचा साठा जप्त केला आहे. दोन स्वतंत्र कारवायांमध्ये एकूण 1 लाख 55 हजार 640 रुपयांचा माल जप्त करण्यात आल्याने अन्न व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे 28 मे रोजी पाचोरा तालुक्यातील वरखेडी-वाघोडे परिसरात तपासणी मोहीम राबविण्यात आली. या कारवाईदरम्यान रिफाइन्ड सोयाबीन तेल अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या नियमांचे उल्लंघन करून पॅकिंगशिवाय खुल्या स्वरूपात विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी तत्काळ तेलाचे नमुने प्रयोगशाळा विश्लेषणासाठी घेतले. तसेच 448 किलो वजनाचा 80 हजार 640 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी संबंधित उत्पादकापर्यंत चौकशी सुरू असून दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
याच धर्तीवर 2 जून रोजी चाळीसगाव येथे विनापरवाना शीतपेय विक्रेत्यावर छापा टाकण्यात आला. तपासणीदरम्यान ‘Monster Energy’ आणि ‘Zero Energy Monster Energy Ultra’ या कार्बोनेटेड कॅफिनयुक्त शीतपेयांचे नमुने अन्न सुरक्षा मानकांनुसार नसल्याचे आढळून आले. अधिकाऱ्यांनी या शीतपेयांचे नमुने तपासणीसाठी पाठवले असून 350 मिली क्षमतेचे 480 कॅन आणि 120 कॅन असा एकूण 75 हजार रुपयांचा साठा जप्त केला आहे.
अन्न व औषध प्रशासनाने या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेऊन संबंधित पुरवठादार आणि उत्पादकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी त्यांच्या कार्यक्षेत्रातील अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. तसेच बाजारात उपलब्ध असलेला संबंधित उत्पादनांचा साठा परत मागविण्यासाठी उत्पादक कंपनीला नोटीसही बजावण्यात आली आहे.
ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहआयुक्त (अन्न) एस. आर. करकाळे यांच्या देखरेखीखाली पार पडली. जळगावचे सहायक आयुक्त (अन्न) दीनानाथ शिंदे यांच्यासह अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर, शरद पवार आणि योगराज सूर्यवंशी यांनी कारवाईत सक्रिय सहभाग घेतला.
दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यातील अन्न व्यावसायिकांना कोणत्याही प्रकारचे खाद्यतेल खुल्या स्वरूपात विक्री न करण्याचे आवाहन केले आहे. ग्राहकांनीही केवळ पॅकबंद आणि अधिकृत खाद्यतेलाचीच खरेदी करावी, असे सांगण्यात आले आहे. तसेच भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री किंवा अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असल्याची माहिती आढळल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाच्या टोल-फ्री क्रमांक 1800222365 वर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.



