
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी तसेच स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा उद्योग मित्र समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत एमआयडीसी विस्तार, पायाभूत सुविधा, उद्योगांसमोरील अडचणी आणि रोजगारनिर्मिती यांसह विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीत जळगाव जिल्ह्यातील विस्तारित एमआयडीसी प्रकल्पासाठी कुसुंबा, चिंचोली आणि पिंपळे परिसरातील भूसंपादन प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला. औद्योगिक क्षेत्राच्या वाढत्या गरजा लक्षात घेता या प्रक्रियेला गती देण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच एमआयडीसी परिसरात फायर स्टेशन उभारण्यासाठी आवश्यक अंदाजपत्रकीय आराखड्याच्या मंजुरीसाठी पाठपुरावा करण्यावर भर देण्यात आला.
कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ईएसआयसी) रुग्णालयासाठी एमआयडीसीकडून जागा हस्तांतरित करण्याची प्रक्रिया आणि रुग्णालयाच्या बांधकामासंदर्भातील प्रगतीचाही आढावा घेण्यात आला. औद्योगिक कामगारांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
वीजपुरवठा आणि पायाभूत सुविधांच्या विकासाच्या अनुषंगाने एमआयडीसीकडून महावितरणला दोन ठिकाणी नवीन सबस्टेशन उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. यामुळे भविष्यातील औद्योगिक वीज गरजा पूर्ण करण्यास मदत होणार आहे. याशिवाय ट्रक टर्मिनलच्या प्रलंबित बांधकामाच्या विषयावरही चर्चा झाली.
अमळनेर औद्योगिक क्षेत्रातील रस्ते आणि पाणीपुरवठ्यासंबंधीच्या समस्या तातडीने सोडविण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या. उद्योगांना आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध झाल्यास गुंतवणुकीला अधिक चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
जळगाव शहरातील काशीनाथ चौफुली ते एम-सेक्टर मार्गाच्या विकासासह बाह्यवळण रस्त्याच्या अंदाजपत्रकाची तयारी करण्याबाबतही विचारविनिमय झाला. तसेच महानगरपालिका हद्दीत महावितरणसाठी दोन जागा उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावावर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
स्थानिक युवकांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या माध्यमातून रोजगार मेळावे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या रोजगार मेळाव्यांमध्ये एमआयडीसीतील उद्योग आणि विविध औद्योगिक संघटनांचा सक्रिय सहभाग राहणार आहे.
यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी जिल्ह्यात उद्योगस्नेही वातावरण निर्माण करण्यासाठी वीज, रस्ता, पाणी आणि सुरक्षा यांसारख्या मूलभूत सुविधा वेळेत उपलब्ध करून देणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. प्रशासन आणि उद्योजक यांच्यातील समन्वय अधिक प्रभावी करून विकासकामांना गती देण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले. तसेच स्थानिक रोजगारनिर्मिती आणि औद्योगिक गुंतवणुकीला चालना देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हा उद्योग मित्र समितीच्या बैठकीत एमआयडीसी विस्तार, पायाभूत सुविधा बळकटीकरण आणि रोजगारनिर्मिती यांवर विशेष भर देण्यात आल्याने जळगाव जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



