
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । विद्यार्थ्यांमध्ये संवादकौशल्य, नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि व्यावसायिक क्षमता विकसित करण्याच्या उद्देशाने गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये बार्कलेज लाइफ स्किल ट्रेनिंग अंतर्गत आयोजित दोन दिवसीय सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. स्टुडंट्स सपोर्ट अँड प्रोग्रेशन सेल आणि जीटीटी फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

१ आणि २ जून २०२६ रोजी आयोजित या प्रशिक्षण कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य विशाखा गणविर यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारीवृंद आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. प्रशिक्षणासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून कॉर्पोरेट ट्रेनर व लीडरशिप कोच अक्षय भालेराव यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
अक्षय भालेराव यांनी आधुनिक व्यावसायिक क्षेत्रातील स्पर्धात्मक वातावरणात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांची माहिती दिली. संवादकौशल्य, प्रभावी व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्वगुण, संघभावना, आत्मविश्वास वृद्धी, व्यावसायिक शिष्टाचार तसेच सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर यांसारख्या विषयांवर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींची माहिती मिळाली.
कार्यक्रमात केवळ व्याख्यानांपुरते मर्यादित न राहता विविध प्रात्यक्षिक उपक्रम, गटचर्चा, भूमिकानाट्य (रोल प्ले), सादरीकरणे आणि कौशल्यवर्धक कृतींचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळाली. सहभागी विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण सत्रे माहितीपूर्ण, प्रेरणादायी आणि भविष्यासाठी उपयुक्त ठरल्याची भावना व्यक्त केली.
महाविद्यालय प्रशासन, स्टुडंट्स सपोर्ट अँड प्रोग्रेशन सेल आणि जीटीटी फाउंडेशन यांच्या समन्वयातून हा उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या समारोपावेळी विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणातून मिळालेली कौशल्ये वैयक्तिक तसेच व्यावसायिक जीवनात प्रभावीपणे वापरण्याचा संकल्प व्यक्त केला.



