Home Cities जळगाव डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचा आदर्श उपक्रम; कचऱ्यातून तयार होते ऊर्जा

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचा आदर्श उपक्रम; कचऱ्यातून तयार होते ऊर्जा

0
13


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ऊर्जा बचत, पर्यावरण संरक्षण आणि सेंद्रिय कचऱ्याचे प्रभावी व्यवस्थापन यांचा संगम साधणारा डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या अन्नपूर्णालयातील गोबरगॅस प्रकल्प सध्या विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या स्वच्छता व शाश्वत ऊर्जा वापराच्या आवाहनाला प्रतिसाद देत महाविद्यालय प्रशासनाने राबविलेला हा उपक्रम दररोज १० ते १२ एलपीजी सिलेंडरची बचत करून ऊर्जा निर्मितीचे आदर्श मॉडेल ठरला आहे.

महाविद्यालय परिसरातील पशुधनातून मिळणारे शेण, अन्नपूर्णालयातील उरलेला अन्नकचरा तसेच इतर सेंद्रिय पदार्थांचा वापर करून हा गोबरगॅस प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. दररोज सुमारे ४ ते ६ टन जैविक कचऱ्यावर प्रक्रिया करून या प्रकल्पातून अंदाजे १६० ते २०० किलो बायोगॅसची निर्मिती केली जाते. या निर्मित गॅसचा वापर स्वयंपाक, चहा-नाश्ता तयार करणे आणि गरम पाणी उपलब्ध करण्यासाठी केला जातो.

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या अन्नपूर्णालयामध्ये दररोज सुमारे दोन ते अडीच हजार लोकांसाठी भोजनाची व्यवस्था केली जाते. एवढ्या मोठ्या प्रमाणातील स्वयंपाकासाठी लागणाऱ्या इंधनाचा मोठा हिस्सा या गोबरगॅस प्रकल्पातून उपलब्ध होत असल्याने एलपीजीवरील खर्चात लक्षणीय बचत होत आहे. त्यामुळे ‘वेस्ट टू एनर्जी’ ही संकल्पना प्रत्यक्षात यशस्वीपणे राबविली जात असल्याचे दिसून येते.

अन्नपूर्णालयाचे प्रमुख डी. टी. राव तसेच डॉ. उल्हास पाटील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. सपकाळे यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प साकारण्यात आला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे ऊर्जा निर्मितीसोबतच स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनालाही चालना मिळत आहे.

भविष्यातील ऊर्जा संकटाचा विचार करून संस्थेने अनेक वर्षांपूर्वीच या प्रकल्पाची अंमलबजावणी केली होती. आज हा प्रकल्प यशस्वीपणे कार्यरत असून शैक्षणिक संस्था, रुग्णालये आणि मोठ्या सामुदायिक भोजनालयांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. विविध स्तरांतून या उपक्रमाचे कौतुक होत असून पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाच्या दिशेने उचललेले हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.


Protected Content

Play sound