
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय हालचालींना मोठा वेग आला. तब्बल १६ उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज दाखल केल्याने निवडणुकीचे चित्र अधिक रंगतदार झाले असून जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सकाळपासूनच विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. उमेदवारांनी समर्थकांसह उपस्थित राहून उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे परिसरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्सुकता आणि राजकीय चर्चांना उधाण आले होते. आगामी काळात या निवडणुकीत कोणते समीकरण जुळणार आणि अंतिम लढत कोणामध्ये होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शेवटच्या दिवशी नामनिर्देशन अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये महायुतीतर्फे भाजपचे नंदकिशोर भागवत महाजन यांनी तर महाविकास आघाडीतर्फे शिवसेना ठाकरे गटाचे शरद शामराव तायडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच प्रवीण गंगाराम पाटील, चौधरी निलेश सुरेश, आसिफ मोहम्मद दारा मोहम्मद, सुनील नेमिदास जंगले, शेख दानिश शेख निसार, जावेद इकबाल अब्दुल रशीद, , शरद शामराव तायडे, सचिन संतोष चौधरी, अनिल छबिलदास चौधरी, रेश्मा कुंदन काळे, दीपक काशिनाथ धांडे, निलेश गणेश झोपे, कलीमखान हैदरखान मनियार, हितेंद्र रमेश देशमुख आणि घृष्णेश्वर रामकृष्ण पाटील यांनी अपक्ष म्हणून उमेदवारांनी अर्ज दाखल केला.
यंदाच्या विधानपरिषद निवडणुकीत प्रमुख पक्षांसह काही अपक्ष उमेदवारांनीही रिंगणात उतरल्यामुळे लढत अधिक चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या जळगावच्या नगरसेविका रेश्मा काळे, भुसावळचे दीपक धांडे यांनी यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. अंतिम दिवशी मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाल्यामुळे राजकीय पक्षांच्या रणनीतींना नव्याने दिशा मिळणार असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींमध्येही या निवडणुकीबाबत उत्सुकता वाढली असून संभाव्य निकालाबाबत चर्चांना जोर आला आहे.
आता उमेदवारी अर्जांची छाननी आणि त्यानंतर अर्ज माघारीची प्रक्रिया पार पडणार असल्याने अनेक इच्छुक उमेदवारांचे अंतिम निर्णय महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यानंतरच निवडणुकीचे नेमके चित्र स्पष्ट होणार असले तरी शेवटच्या दिवशी झालेल्या अर्जांच्या संख्येमुळे जळगावच्या राजकारणात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.



