Home Cities अमळनेर अमळनेर शेतकी संघ निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे 15 पैकी 10 जागांवर निर्विवाद बहुमत

अमळनेर शेतकी संघ निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे 15 पैकी 10 जागांवर निर्विवाद बहुमत

0
12


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शेतकी संघाच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या निवडणुकीत आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित सहकार पॅनलने दणदणीत विजय मिळवत आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. १५ पैकी तब्बल १० जागांवर विजय मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसने निर्विवाद बहुमत प्राप्त केले, तर काँग्रेसला तीन जागांवर समाधान मानावे लागले. खासदार स्मिता वाघ यांच्या नेतृत्वाखालील भाजप पॅनलला केवळ दोन जागांवर विजय मिळाल्याने पक्षाला मोठा धक्का बसला. या निकालामुळे अमळनेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आणि आमदार अनिल पाटील यांचे सहकार क्षेत्रातील प्रभावी नेतृत्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.

इंदिरा भवन येथे सकाळपासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली. निकालाचे कल हळूहळू स्पष्ट होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढत गेला. व्यक्तिशः मतदारसंघातील मतमोजणीत काँग्रेसला तीन तर राष्ट्रवादी काँग्रेसला दोन जागा मिळाल्या. या मतदारसंघात भाजपला एकही जागा मिळवता आली नाही. त्यानंतर महिला मतदारसंघातील दोन्ही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी विजय मिळवत पक्षाला मोठी आघाडी मिळवून दिली.

सोसायटी मतदारसंघात पाच जागांसाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसने तीन जागा जिंकल्या. भाजपला एक जागा मिळाली. पाचव्या जागेसाठी दोन उमेदवारांना समान मते मिळाल्याने ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. त्यामध्ये भाजपचे प्रफुल पाटील विजयी ठरले. त्यानंतर ओबीसी, एससी-एसटी आणि व्हीजेएनटी या तिन्ही महत्त्वाच्या प्रवर्गांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी विजय मिळवत निकालावर आपली मजबूत पकड कायम ठेवली. भाजपला या प्रवर्गांत एकही यश मिळवता आले नाही.

निकाल जाहीर होताच मतदान केंद्राबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आमदार अनिल पाटील यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. गुलालाची उधळण करत आणि जल्लोषात एकमेकांचे अभिनंदन करत कार्यकर्त्यांनी विजय साजरा केला. निवडणुकीचा निकाल जाहीर होताच परिसरात राजकीय चर्चांना वेग आला.

पॅनल टू पॅनल मतदानातही राष्ट्रवादी काँग्रेस स्पष्टपणे आघाडीवर राहिल्याचे चित्र दिसून आले. व्यक्तिशः मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला अंदाजे २२०० पॅनल टू पॅनल मते मिळाली. काँग्रेसला सुमारे १५०० तर भाजपला सुमारे १००० मते मिळाल्याची माहिती समोर आली. विशेष म्हणजे अनेक मतदारांनी पॅनलमधील पाच उमेदवारांसह अतिरिक्त मतदान केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची काही मते बाद झाली. या बाद मतांचा फटका बसला नसता तर राष्ट्रवादीच्या किमान आणखी दोन जागा वाढल्या असत्या, अशी चर्चा मतमोजणी केंद्रावर रंगली.

व्यक्तिशः मतदारसंघात एकूण ७९२५ मतदान झाले. त्यापैकी ८७३ मते बाद ठरली. किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुभाष पाटील, सुरेश पिरण पाटील आणि प्रा. श्याम पवार विजयी झाले, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाजी पाटील आणि संजय पुनाजी पाटील विजयी झाले. महिला मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुषमा वासुदेव देसले आणि मालुबाई बापूराव पाटील यांनी विजय मिळवला.

सोसायटी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन पाटील, गणेश भामरे आणि सचिन पाटील विजयी झाले. भाजपचे जितेंद्र पाटील आणि ईश्वर चिठ्ठीतून प्रफुल पाटील विजयी झाले. ओबीसी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे विक्रांत पाटील, एससी-एसटी मतदारसंघातून शंकर बंडू बैसाणे आणि व्हीजेएनटी प्रवर्गातून रणजित भीमसिंग पाटील यांनी विजय मिळवला.

निकालानंतर आमदार अनिल पाटील यांनी मतदारांचे आभार मानले. “शेतकी संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विकासासाठी आणि संस्थेच्या उन्नतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस सातत्याने काम करत आली आहे. मतदारांनी आमच्यावर पुन्हा विश्वास दाखवला, याबद्दल आम्ही ऋणी आहोत. निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमची इच्छा होती, मात्र परिस्थिती वेगळी होती. तरीही मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामावर विश्वास ठेवत स्पष्ट कौल दिला,” असे ते म्हणाले.


Protected Content

Play sound