Home Cities मुक्ताईनगर धक्कादायक ! सारोळा जलशुद्धीकरण केंद्रात आढळला मृत बैल

धक्कादायक ! सारोळा जलशुद्धीकरण केंद्रात आढळला मृत बैल

0
5


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील सारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्र परिसरात गेल्या सात ते आठ दिवसांपासून एका बैलाचा मृतदेह पडून असूनही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, याच ठिकाणाहून परिसरात पाणीपुरवठा सुरू असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

बोदवड रोडवरील जलशुद्धीकरण केंद्र परिसरात मृत बैल कुजलेल्या अवस्थेत पडून असल्याने तीव्र दुर्गंधी पसरली आहे. या प्रकारामुळे दूषित पाण्याचा धोका निर्माण झाला असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. स्थानिकांनी वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधूनही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

नागरिकांच्या जीविताशी संबंधित इतका गंभीर प्रकार घडत असताना प्रशासनाची उदासीनता संतापजनक असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली. लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या जलशुद्धीकरण यंत्रणेच्या देखभालीबाबतही या घटनेमुळे प्रश्न उपस्थित होत आहेत.

या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, मृत जनावराची त्वरित विल्हेवाट लावावी आणि नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा सुनिश्चित करावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे. “स्वच्छ पाणी पुरवण्याची जबाबदारी प्रशासनाची असताना असा निष्काळजीपणा होत असेल, तर न्याय मागायचा कुणाकडे?” असा संतप्त सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे.


Protected Content

Play sound