
यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल-भुसावळ मार्गावरील अंजाळे घाट परिसरात झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून त्याच्यासोबत असलेली महिला गंभीर जखमी झाली आहे. भरधाव वेगातील चारचाकी डंपरने मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लखन अशोक जोहरी (वय ३२, रा. यावल) हे त्यांच्या मोटरसायकलने भुसावळकडून यावलकडे येत होते. त्यांच्या दुचाकीवर त्यांची वहिनी अनिता संदीपसिंग जोहरी (वय ५०) या देखील सोबत होत्या. दरम्यान, यावलहून भुसावळकडे भरधाव वेगाने जात असलेल्या डंपरने अंजाळे घाट परिसरात त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की लखन जोहरी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत जखमींना उपचारासाठी हलविण्याचे प्रयत्न केले. गंभीर जखमी झालेल्या अनिता जोहरी यांना प्राथमिक उपचारांनंतर पुढील उपचारासाठी जळगाव येथे रवाना करण्यात आले आहे.
या अपघाताची माहिती मिळताच यावल पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला असून संबंधित डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
अंजाळे घाट परिसरात वाढत्या वेगामुळे आणि जड वाहनांच्या वाहतुकीमुळे अपघातांच्या घटना वारंवार घडत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. या मार्गावर वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे तसेच वेग नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे.
या दुर्दैवी अपघातामुळे जोहरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांकडून अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास सुरू असून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.



