
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अक्सा नगर भागात मूक प्राण्यांवर अत्यंत क्रूरपणे अत्याचार करून त्यांना कत्तलखान्यात पाठवण्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अक्सा नगरमधील आय-के टॉवरच्या पाठीमागे असलेल्या एका बंद प्लॉटमधील पडक्या घरात बेकायदेशीरपणे गोवंश डांबून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी रात्रीच्या सुमारास तातडीने छापा टाकून ३८ हजार रुपये किमतीचे गोवंश जातीचे ४ बैल जप्त केले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, संशयित आरोपी इम्रान खान शरीफ खान (उर्फ आय के, रा. आय के टॉवर, अक्सा नगर, जळगाव) याने हे बैल आपल्या ताब्यात बेकायदेशीरपणे बाळगून ठेवले होते. ही माहिती एमआयडीसी पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीसांना घटनास्थळी जावून पाहणी केली असता चारही बैलांना अत्यंत डांबून ठेवल्यासारखे आखूड दोरीने बांधून ठेवल्याचे निष्पन्न झाले. पोलीसांनी चारही बैलांची सुटका केली आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राहूल घेटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.



