Home Cities जळगाव रेल्वे ग्रुप डी पात्र उमेदवारांचा संघर्ष तीव्र ; नियुक्तीशिवाय आंदोलन मागे घेणार...

रेल्वे ग्रुप डी पात्र उमेदवारांचा संघर्ष तीव्र ; नियुक्तीशिवाय आंदोलन मागे घेणार नाही ठाम भूमिका


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रेल्वे ग्रुप डीच्या पात्र उमेदवारांना तातडीने नियुक्ती द्यावी या प्रमुख मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन आता अधिक तीव्र होत असून जळगावातील शिवतीर्थ मैदानावर सुरू असलेले आमरण उपोषण चौथ्या दिवशीही कायम राहिले आहे. गेल्या चार दिवसांपासून आंदोलकांनी आपल्या मागण्यांसाठी ठाम भूमिका घेतली असून रेल्वे प्रशासनाकडून सकारात्मक निर्णय होत नसल्याने उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. “ऑनलाइन पॅनल लागल्याशिवाय किंवा नियुक्ती आदेश मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही,” अशी स्पष्ट भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

रेल्वे भरती प्रक्रियेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यास विलंब होत असल्याचा आरोप करत उमेदवारांनी शिवतीर्थ मैदानावर आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनामुळे प्रशासनाचेही लक्ष वेधले गेले असून आंदोलकांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट घेऊन संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली. पात्र असूनही नियुक्तीपासून वंचित राहावे लागत असल्याने अनेक उमेदवार आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर आपली भूमिका ठामपणे मांडत न्याय मिळवून देण्याची मागणी केली.

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी या संदर्भात रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधत जनरल मॅनेजर यांच्याकडे विचारणा केली. मात्र संबंधित अधिकाऱ्यांकडून या प्रश्नाबाबत स्पष्ट माहिती मिळाली नसल्याचे समजते. त्यानंतर भुसावळ विभागातील रेल्वे प्रशासनाने हालचाली वाढवल्या. भुसावळचे एडीआरएम तसेच रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांची भेट घेत चर्चा केली. जळगाव येथील आरपीएफचे अमित कुमार यादव यांनीही आंदोलकांशी संवाद साधत त्यांच्या मागण्या पुन्हा लेखी स्वरूपात देण्याची विनंती केली.

रेल्वे अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांना मागण्या वरिष्ठ स्तरावर पोहोचवण्याचे आश्वासन दिले आणि उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र आंदोलकांनी यावेळी स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली. “फक्त आश्वासनांवर आता विश्वास ठेवता येणार नाही. आम्हाला ऑनलाइन पॅनल लागल्याचे अधिकृत पत्र किंवा नियुक्ती आदेश मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील,” असा ठाम निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला. या भूमिकेमुळे अधिकाऱ्यांनाही निवेदन स्वीकारून माघारी फिरावे लागले.

शिवतीर्थ मैदानावरील आंदोलनस्थळी दिवसभर उमेदवार, त्यांचे कुटुंबीय आणि विविध स्तरातील नागरिक भेट देत आहेत. काही उमेदवारांची प्रकृती खालावण्याची शक्यताही व्यक्त होत असल्याने प्रशासनावर दबाव वाढताना दिसत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भरती प्रक्रियेची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांसाठी ही लढाई आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे.


Protected Content

Play sound