
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिकेत कचरा मोजणीसाठी बसविण्यात आलेल्या वजनकाट्यांच्या खरेदी आणि वापराबाबत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप उपमहापौर मनोज चौधरी यांनी केला आहे. ५ लाख ७१ हजार रुपयात ५० टन क्षमतेचा वजन काटा बसविण्यात येत असतांना महापालिकेने ९ लाख ५० हजार रुपये खर्च करून ३० टन क्षमतेचा वजन काटा बसविला आहे. या व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याची शंका त्यांनी उपस्थित करत चौकशीची मागणी केली आहे.

मनोज चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य शासनाने नगरपालिका आणि महानगरपालिकांना ५० टन क्षमतेचे वजनकाटे बसविण्याचे निर्देश दिले होते. मात्र जळगाव महापालिकेच्या आरोग्य विभागाने ३० टन क्षमतेचे दोन वजनकाटे बसविले. यापैकी एक वजनकाटा टीबी हॉस्पिटल परिसरात तर दुसरा डम्पिंग ग्राऊंडवर बसविण्यात आला होता. मात्र काही काळानंतर टीबी हॉस्पिटल परिसरातील वजनकाटा बंद करण्यात आला. त्या ठिकाणी ई-बस चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार असल्याचे कारण देण्यात आले, परंतु तो वजनकाटा नेमका कुठे हलविण्यात आला याबाबत अधिकाऱ्यांकडून स्पष्ट माहिती दिली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला.
गेल्या दोन वर्षांपासून टीबी हॉस्पिटल परिसरातील वजनकाटा बंद असल्याने महापालिका खासगी वजनकाट्यावर कचऱ्याचे वजन करत आहे. यासाठी महापालिकेकडून लाखो रुपयांची देयके अदा करण्यात आली आहेत. मागील सहा ते सात महिन्यांतच खासगी वजनकाटा मालकाला १३ लाख ३७ हजार रुपये अदा करण्यात आल्याची माहिती उपमहापौरांनी दिली. आणखी काही महिन्यांची बिले प्रलंबित असल्याचेही त्यांनी नमूद केले. खासगी वजनकाट्यावर एवढा खर्च करण्यापेक्षा स्वतःचे नवीन वजनकाटे उभारले असते तर वर्षभराच्या बिलातच दोन ५० टन क्षमतेचे वजनकाटे बसले असते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
डम्पिंग ग्राऊंडवरील महापालिकेचा वजनकाटा देखील अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा वजनकाटा दुरुस्त करण्यासाठी सुमारे ३ लाख ९७ हजार रुपये खर्च येणार असल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मात्र खासगी वजनकाट्यांसाठी लाखो रुपये उपलब्ध होतात, पण स्वतःचा वजनकाटा दुरुस्त करण्यासाठी निधी उपलब्ध होत नाही का, असा प्रश्न उपमहापौरांनी उपस्थित केला आहे.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून जाणूनबुजून वजनकाटा दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा संशयही मनोज चौधरी यांनी व्यक्त केला आहे. स्वतःचा वजनकाटा सुरू झाल्यास भ्रष्टाचाराला आळा बसेल, मात्र खासगी वजनकाट्यावर वाहनांचे वजन केल्यास मनमानी करण्यास वाव मिळतो, असा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
यासोबतच आरोग्य विभागातील कर्मचारी व्यवस्थापनावरही उपमहापौरांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मनपाच्या इमारतीत कार्यरत असलेल्या आठ कर्मचाऱ्यांपैकी दोन कर्मचारी गेल्या १५ दिवसांपासून रजेचा अर्ज न देता गैरहजर असल्याचा दावा त्यांनी केला. संबंधित कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी दोन मुकादम नियुक्त असूनही कोणतीही कारवाई झालेली नसल्याने आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा प्रकार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.



