Home आरोग्य  डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दुर्मिळ शस्त्रक्रियेतून ७० वर्षीय रुग्णाला नवजीवन

 डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दुर्मिळ शस्त्रक्रियेतून ७० वर्षीय रुग्णाला नवजीवन


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  कानातून सतत पाणी येणे, तीव्र डोकेदुखी आणि कॅन्सरची शक्यता व्यक्त झाल्याने चिंतेत असलेल्या ७० वर्षीय रुग्णावर जळगावातील डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी आणि अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आली. वेळेवर अचूक निदान आणि आधुनिक उपचारपद्धतीमुळे रुग्ण केवळ तीन महिन्यांत पूर्णपणे बरा झाला असून सध्या सामान्य जीवन जगत आहे. या यशस्वी उपचारामुळे रुग्णालयाच्या ईएनटी विभागाच्या कार्याचे कौतुक होत आहे.

अमोदा येथील देवीदास तायडे (वय ७०) यांना गेल्या काही महिन्यांपासून कानातून सतत पाणी येत होते. त्यासोबतच कानाच्या वरच्या भागात तीव्र वेदना आणि असह्य डोकेदुखीचा त्रास वाढत चालला होता. विविध ठिकाणी उपचार करूनही त्यांना आराम मिळत नव्हता. कान आणि नाकाच्या भागाची तब्बल तीन वेळा बायोप्सी करण्यात आली होती. काही डॉक्टरांनी कॅन्सरची शक्यता व्यक्त केल्याने रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

अखेर त्यांनी जळगावातील डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात उपचारासाठी धाव घेतली. येथे ईएनटी विभागप्रमुख डॉ. अनुश्री अग्रवाल यांनी रुग्णाची सखोल तपासणी केली. सीटी स्कॅन आणि एमआरआय तपासण्यांनंतर रुग्णाला ‘स्कल बेस ऑस्टिओमायलायटिस’ हा दुर्मिळ पण गंभीर संसर्गजन्य आजार असल्याचे स्पष्ट झाले. हा आजार वेळेत नियंत्रणात आणला नाही तर तो मेंदूपर्यंत पसरण्याची शक्यता असल्याने परिस्थिती गंभीर बनू शकते.

निदान स्पष्ट झाल्यानंतर ईएनटी तज्ज्ञांच्या टीमने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नाक आणि कान या दोन्ही मार्गांद्वारे एकाच वेळी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. सुमारे सहा ते आठ तास चाललेल्या या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेदरम्यान संसर्गग्रस्त भाग अत्यंत काळजीपूर्वक काढून टाकण्यात आला आणि आवश्यक ती स्वच्छता करण्यात आली. या शस्त्रक्रियेसाठी डॉ. अनुश्री अग्रवाल यांना डॉ. सायकत बासू आणि भूलशास्त्र तज्ज्ञांच्या टीमने सहकार्य केले.

विशेष म्हणजे, शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्याच दिवशी रुग्णाच्या डोकेदुखीत मोठी घट झाली आणि कानातून पाणी येणे पूर्णपणे थांबले. पुढील काही आठवड्यांत औषधोपचार आणि नियमित फॉलोअपमुळे त्यांची प्रकृती झपाट्याने सुधारली. अवघ्या तीन महिन्यांत रुग्ण पूर्णपणे बरा झाला असून सध्या तो सामान्य आयुष्य जगत आहे.

ही संपूर्ण शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत करण्यात आली. त्यामुळे आर्थिकदृष्ट्याही रुग्णाला मोठा दिलासा मिळाला.

याबाबत बोलताना ईएनटी विभागप्रमुख डॉ. अनुश्री अग्रवाल यांनी सांगितले की, “स्कल बेस ऑस्टिओमायलायटिस हा आजार दुर्मिळ असला तरी अत्यंत गंभीर आहे. अनेकदा त्याची लक्षणे साध्या कानाच्या संसर्गासारखी वाटतात, त्यामुळे निदान उशिरा होते. योग्य वेळी सीटी स्कॅन आणि एमआरआयसारख्या तपासण्या केल्यास अचूक निदान करता येते. या प्रकरणात वेळेवर निदान आणि संयुक्त शस्त्रक्रिया केल्यामुळे रुग्णाला पूर्णपणे बरे करता आले.”

 


Protected Content

Play sound