
जामनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात गोवंशाची अवैध वाहतूक, अनधिकृत कत्तल आणि बेकायदेशीर कत्तलखान्यांवर आळा घालण्यासाठी जामनेरमध्ये पोलीस प्रशासन आणि नगर परिषद प्रशासनाने संयुक्तपणे मोठी कारवाई केली. विशेष मोहिमेदरम्यान विविध भागांत छापेमारी करत तब्बल ६७ गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली असून या प्रकरणी पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे जामनेर शहरात मोठी खळबळ उडाली असून शासनाच्या आदेशांची कठोर अंमलबजावणी करण्याचा स्पष्ट संदेशही देण्यात आला आहे.

जामनेरमधील ही विशेष मोहीम जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि चाळीसगाव परिमंडळाचे अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. पाचोरा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहोम, जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार, सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अशोक कोकाटे तसेच CORT पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद कथोरे, फत्तेपूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव यांच्यासह मोठ्या पोलीस पथकाने या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. जामनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी नितीन बागुल आणि नगर परिषदेच्या पथकानेही या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.
शासनाच्या निर्देशानुसार गोवंशाची अवैध वाहतूक आणि कत्तल रोखण्यासाठी शहरातील संवेदनशील भागांमध्ये गोपनीय माहितीच्या आधारे तपासणी मोहीम राबवण्यात आली. घोडे पीर बाबा घरकुल परिसर, मदनी नगर, इस्लामपुरा आणि पहूर गल्ली या भागांमध्ये संयुक्त पथकाने अचानक छापे टाकले. संशयित ठिकाणांची सखोल तपासणी करण्यात आली. या कारवाईदरम्यान अंदाजे ६ लाख १० हजार रुपयांची ६७ गोवंशीय जनावरे ताब्यात घेण्यात आली. प्रशासनाच्या अचानक झालेल्या या कारवाईमुळे परिसरात काही काळ मोठी हालचाल पाहायला मिळाली.
तपासणीदरम्यान एका ठिकाणी गोवंशाचे मांस आढळून आल्याने प्रशासनाने अधिक गंभीरतेने कारवाई केली. त्यानंतर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ अंतर्गत जामनेर पोलीस ठाण्यात एकूण पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधित प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
कारवाईदरम्यान ताब्यात घेतलेल्या सर्व गोवंशीय जनावरांना सुरक्षिततेच्या दृष्टीने जळगाव येथील गोशाळेत हलविण्यात आले आहे. त्यांचे संगोपन आणि संवर्धन योग्य पद्धतीने व्हावे यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. या मोहिमेत पोलीस विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासोबत नगर परिषद आरोग्य विभागाचे आरोग्य निरीक्षक, संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि सफाई कर्मचारी यांनीही सक्रिय सहभाग नोंदवला. सर्व विभागांच्या समन्वयातून ही कारवाई प्रभावीपणे पूर्ण करण्यात आली.



