
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील भागपूर परिसरात आरोग्य विभागामार्फत ‘शून्य कुष्ठरुग्ण प्रसार शोध अभियान’ प्रभावीपणे राबविण्यात येत असून नागरिकांमध्ये कुष्ठरोगाबाबत जनजागृतीसह घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येत आहे. १५ मे ते १५ जून या कालावधीत जिल्हाभरात सुरू असलेल्या या विशेष अभियानाला भागपूर, उमाळा आणि देव्हारी गावांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून संभाव्य रुग्णांचा शोध घेण्यासाठी आरोग्य यंत्रणा सक्रिय झाली आहे.

आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यात कुष्ठरोगाचे निर्मूलन करण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर आणि कुष्ठरोग सहाय्यक संचालक डॉ. इरफान तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवले जात आहे. जळगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पांढरे, प्राथमिक आरोग्य केंद्र नशिराबादचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणव भदादे तसेच तालुका कुष्ठरोग तंत्रज्ञ अनिल नन्नवरे यांच्या सूचनेनुसार भागपूरसह आसपासच्या गावांमध्ये सर्वेक्षणाची मोहीम सुरू आहे.
या अभियानांतर्गत आरोग्य पथकाने भागपूर गावात घरोघरी भेट देत नागरिकांची तपासणी केली. संशयित कुष्ठरुग्णांची ओळख पटविणे, लक्षणांची माहिती देणे आणि तातडीने उपचार सुरू करण्याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. आरोग्य उपकेंद्र कंडारी येथील आरोग्य सेवक सुनील गोविंद ढाके, आरोग्य सेविका योगिता कोकाटे आणि समुदाय आरोग्य अधिकारी शिरीन पाटील यांनी गावात प्रत्यक्ष भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला. कुष्ठरोगाची प्राथमिक लक्षणे, त्यापासून बचावाचे उपाय, उपचारांची उपलब्धता आणि वेळेत निदान झाल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो, याची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली.
विशेष म्हणजे ज्या गावांमध्ये गेल्या पाच वर्षांपासून एकही कुष्ठरुग्ण आढळलेला नाही, अशा गावांमध्येही विशेष सर्वेक्षणावर भर देण्यात येत आहे. संभाव्य रुग्ण शोधून त्यांना तातडीने उपचार मिळावेत आणि आजाराचा प्रसार होऊ नये, यासाठी आरोग्य विभाग अधिक दक्षतेने काम करत आहे. ग्रामीण भागात जागरूकता वाढवून कुष्ठरोगाबाबत असलेले गैरसमज दूर करण्यावरही भर दिला जात आहे.
आरोग्य विभागाच्या या उपक्रमामुळे कुष्ठरोगाचे लवकर निदान होण्यास मोठी मदत होणार असून वेळेवर उपचार मिळाल्यास रुग्ण पूर्णपणे बरे होऊ शकतात. त्याचबरोबर संसर्गाचा प्रसार रोखण्यातही या मोहिमेची महत्त्वाची भूमिका ठरणार आहे. नागरिकांनी आरोग्य पथकाला सहकार्य करावे, लक्षणे आढळल्यास तातडीने माहिती द्यावी आणि कुष्ठरोगाबाबत कोणतीही भीती न बाळगता उपचार घ्यावेत, असे आवाहनही आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.



