
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरात प्लास्टिक व रिसायकल उद्योग क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेत एस. डी. फाउंडेशनचे अध्यक्ष सुहास सुधाकर दुसाने यांना ‘पर्यावरण गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महापौर दीपमाला काळे आणि ज्येष्ठ उद्योजक रजनीकांत कोठारी यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला असून, या निमित्ताने पर्यावरणपूरक उपक्रमांवर सखोल चर्चा घडविण्यात आली.

जळगाव प्लास्टिक आणि रिसायकल उद्योग तसेच GCPRS (Global Conclave On Plastic Recycling And Exhibition – Bharat Mandapam, New Delhi) यांच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल प्रेसिडेंट पार्क येथे आयोजित विशेष परिचर्चा कार्यक्रमात हा सोहळा पार पडला. या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन आणि पुनर्वापर तंत्रज्ञान यावर तज्ज्ञांनी आपले विचार मांडले.
या पुरस्कार वितरण सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजूमामा भोळे उपस्थित होते. तसेच सुप्रीम इंडस्ट्रीजचे महाव्यवस्थापक ज्ञानदेव महाडीक, जळगाव प्लास्टिक रिप्रोसेस असोसिएशनचे अध्यक्ष विनोद बियाणी, जळगाव इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र लठ्ठा आणि GCPRS (मुंबई) चे अध्यक्ष सिद्धार्थ शाह यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमादरम्यान नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे होणाऱ्या जागतिक ‘ग्लोबल कॉन्क्लेव्ह ऑन प्लास्टिक रिसायकलिंग’च्या पार्श्वभूमीवर जळगावात पूर्व-परिचर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या सत्रात प्लास्टिक कचऱ्याचे प्रभावी व्यवस्थापन, पर्यावरणपूरक औद्योगिक विकास आणि शाश्वत विकासाच्या दिशेने होणाऱ्या प्रयत्नांवर सविस्तर चर्चा झाली.
एस. डी. फाउंडेशनच्या माध्यमातून सुहास दुसाने यांनी पर्यावरण संरक्षण आणि रिसायकलिंग क्षेत्रात केलेल्या कार्याचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले. त्यांच्या या कार्यामुळे जळगाव शहराच्या औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रात सकारात्मक बदल घडत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.



