
चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चोपडा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरांची बेकायदेशीरपणे वाहतूक करून त्यांची कत्तल करण्याचा एक गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. नांगलवाडी गावाच्या हद्दीतील नाल्याजवळ, महादेव मंदिराजवळील सार्वजनिक रस्त्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी तब्बल १० गोवंशांना अत्यंत क्रूरतेने, त्यांना जखडून बांधून तसेच चारा-पानी न देता पायी हाकत नेल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलिसांत दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, २५ मे २०२६ रोजी पहाटे ४:०० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. दोन अज्ञात व्यक्ती या गुरांना ताब्यात ठेवून त्यांना कत्तल करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असताना पोलिसांची चाहूल लागताच ते पसार झाले. या कारवाईत पोलिसांनी एकूण ४ लाख २० हजार रुपये किमतीची १० गुरे जप्त केली आहेत. यामध्ये प्रत्येकी ५० हजार रुपये किमतीचे गावठी व गीर जातीचे वेगवेगळ्या वयाचे बैल, प्रत्येकी ३० हजार रुपये किमतीचे गोरे आणि १० हजार रुपये किमतीच्या एका वासराचा समावेश आहे.
या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल मदन रतीलाल पावरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध प्राण्यांचे छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११(१)(G)(J) आणि महाराष्ट्र पशूसंरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५(ए), (बी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक पवनकुमार देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र पुंडलिक कोळी करत आहेत.



