
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्यात उन्हाचा पारा चांगलाच वाढला असून, जळगाव शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. शहरात वेगवेगळ्या भागात दोन जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. केशरलाल दौलत पाटील (वय ५७, रा. चिंचोली, ता. जळगाव) आणि प्रवीण दत्तू मिस्तरी (वय ३६, मूळ रा. काकडे वस्ती, पुणे, ह.मु. जळगाव) अशी मृत झालेल्या दुर्दैवी व्यक्तींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पहिली घटना जामनेर तालुक्यातील देवपिंप्री येथे घडली. केशरलाल पाटील हे दुपारच्या कडक उन्हात सेंट्रिंगचे काम करत होते. दुपारी ३ वाजेच्या सुमारास अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि ते चक्कर येऊन जमिनीवर कोसळले. सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
दुसऱ्या घटनेत, जळगाव शहरातील गजबजलेल्या चित्रा चौक परिसरामध्ये प्रवीण मिस्तरी हा ३६ वर्षीय तरुण बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. नागरिकांनी त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात हलवले, परंतु तिथे पोहोचण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती. या दोन्ही व्यक्तींचा मृत्यू तीव्र उन्हाच्या झळांमुळे म्हणजेच उष्माघाताने झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दोघांच्या संदर्भात संबंधित पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शवविच्छेदनानंतरच स्पष्टता – डॉ. गिरीश ठाकूर
या घटनेबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी सांगितले की, “दोन्ही मृतदेह रुग्णालयात आणले गेले आहेत. प्राथमिक अंदाज उष्माघाताचा असला, तरी मृत्यूचे अचूक कारण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच अधिकृतपणे स्पष्ट होईल.”



