
जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात सध्या पेट्रोल आणि डिझेल टंचाईची तीव्र परिस्थिती निर्माण झाली आहे. या बिकट परिस्थितीत वाहनधारक, शेतकरी आणि सामान्य नागरिकांना इंधनासाठी तब्बल चार ते पाच तास रांगेत उभे राहावे लागत आहे. मात्र, एवढी प्रतीक्षा केल्यानंतरही अनेक पेट्रोल पंप चालकांकडून ‘ऑनलाइन पेमेंट’ स्वीकारण्यास सर्रास नकार दिला जात आहे. या गंभीर व संतापजनक प्रकाराविरोधात मनसेच्या वतीने जिल्हा पुरवठा विभागाला निवेदन सादर केले आहे.

मनसेचे उपमहानगर अध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे आणि जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज जिल्हा पुरवठा कार्यालयात जाऊन निवेदन दिले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकीकडे ‘डिजिटल इंडिया’ आणि ‘कॅशलेस इंडिया’ मोहीम राबवून नागरिकांना ऑनलाईन व्यवहारांचे आवाहन करत आहेत. शासन स्तरावर युपीआय, क्यूआर कोड, आणि ऑनलाईन बँकिंगची सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून दिली असतानाही, जिल्ह्यातील पेट्रोल पंप चालक या धोरणाला विरोध करत असल्याचा आरोप मनसेने केला आहे.
रांगेत उभे राहिल्यानंतर अचानक रोख रकमेची मागणी होत असल्याने ग्राहकांना ऐनवेळी एटीएम शोधण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. यात नागरिकांचा वेळ, आर्थिक नुकसान आणि मानसिक त्रास होत आहे. याशिवाय, शेतीकामासाठी लागणारे जनरेटर, फवारणी यंत्रे आणि पॉवर टिलर प्रत्यक्ष पंपावर आणणे अशक्य असल्याने, शेतकऱ्यांना डब्यांमध्ये किंवा कॅनमध्ये इंधन मिळणे गरजेचे असते. मात्र, पंप चालक शेतकऱ्यांना डब्यात पेट्रोल-डिझेल देण्यास टाळाटाळ करत असल्याने शेतीची कामे ठप्प झाली आहेत.
मनसेच्या प्रमुख मागण्या:
१. जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर ऑनलाईन पेमेंट (UPI/QR Code/Card) स्वीकारणे सक्तीचे करून तसे आदेश काढावेत. २. डिजिटल पेमेंट नाकारणाऱ्या पंपांवर तातडीने दंडात्मक कारवाई करावी. ३. प्रत्येक पेट्रोल पंपावर “ऑनलाईन पेमेंट उपलब्ध आहे” असे फलक लावणे बंधनकारक करावे. ४. शेतकऱ्यांना त्यांच्या शेती अवजारांसाठी डब्यातून सुलभ इंधन वितरण करण्याच्या स्पष्ट सूचना द्याव्यात.
प्रशासनाने यावर तात्काळ योग्य ती कारवाई न केल्यास सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. या निवेदनावर किरण तळेले, विनोद शिंदे, राजेंद्र निकम, ललित शर्मा, प्रकाश जोशी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.



