
यावल लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे येणाऱ्या एका महिंद्रा जितो मालवाहू गाडीने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्याची घटना वाघझिरा ते मालोद रस्त्यावरील सावखेडा शिवारात घडली आहे. या भीषण अपघातात दुचाकीस्वार दिलीप मंगल भिल (वय-३५, रा. चिपखेडा, ता. यावल) यांचा गंभीर दुखापत झाल्याने जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत दुचाकीवर मागे बसलेले अनिल रुपला बारेला (वय ३०) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दिलीप भिल हे आपले नातेवाईक अनिल बारेला यांच्यासह दुचाकी (एमएच ०३ एसी ३११७) ने वाघझिराकडून मालोदकडे जात होते. सावखेडा शिवारातील नाना पाटील यांच्या शेताजवळ सार्वजनिक रस्त्यावर आले असता, समोरून येणाऱ्या महिंद्रा जितो गाडीच्या (एमएच १९ सीवाय ०८८५) वरील चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून वाहन निष्काळजीपणे चालवले आणि दुचाकीला थेट समोरून धडक दिली.
या भीषण अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात चालक आरिफखान सलीमखान (वय २७, रा. किनगाव, ता. यावल) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक किशोर परदेशी हे करीत आहे.



