
अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी मंजूर करण्यात आलेली पाडळसरे धरणावरील १९४.५४ कोटी रुपयांची महत्त्वाकांक्षी 24×7 पाणीपुरवठा योजना सध्या वेगाने प्रगतिपथावर असून रविवारी या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. विशेष म्हणजे शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर हे पहिल्यांदाच एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले. या पाहणी दौऱ्यामुळे अमळनेरच्या विकासासाठी सर्वपक्षीय स्तरावर एकत्रित प्रयत्न सुरू असल्याचा सकारात्मक संदेश नागरिकांमध्ये गेला आहे.

रविवार, २४ मे रोजी सकाळी आमदार अनिल भाईदास पाटील यांनी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नगरसेवकांसह पाडळसरे धरण परिसरातील कामाची पाहणी केली. शहर विकास आघाडीचे नगरसेवक आणि कार्यकर्त्यांचा ताफा सकाळीच पाडळसरे परिसरात दाखल झाला. यावेळी नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांनीही आपल्या नगरसेवकांसह उपस्थिती लावत कामाचा प्रत्यक्ष आढावा घेतला. पाडळसरेजवळ तापी नदीकाठावर सुरू असलेल्या या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या कामांची माहिती अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली.
या योजनेअंतर्गत एक इंटेकवेल, तीन इन्फेक्शन वेल, एक जॅकवेल तसेच कनेक्टिंग मेनचे काम वेगाने सुरू आहे. प्रकल्पातील विविध टप्प्यांचे काम सध्या जोरात सुरू असून कामाच्या गतीबाबत आमदार अनिल पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. नगराध्यक्ष डॉ. बाविस्कर यांनीही तांत्रिक बाबी समजून घेत काही महत्त्वाच्या सूचना मांडल्या. यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे, नगरपालिकेचे अभियंता बैसाणे, मानव सेवा कन्सल्टंट धुळेचे राजेंद्र सोनार आणि विवेक पाटील, ठेकेदार जितेश ठाकरे तसेच राज राठोड यांनी उपस्थित राहून संपूर्ण प्रकल्पाची सद्यस्थिती आणि पुढील नियोजनाची माहिती दिली.
दोन वर्षांपूर्वी आमदार अनिल पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे या योजनेला मंजुरी मिळाली होती. पाडळसरे धरणावर वर्षभर जलसाठा उपलब्ध राहत असल्याने अमळनेर शहरासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. योजना पूर्ण झाल्यानंतर शहरवासीयांना नियमित आणि पुरेशा प्रमाणात दररोज पाणीपुरवठा होणार असून पाणीटंचाईच्या प्रश्नातून मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. या योजनेअंतर्गत शहरात एकूण २११.५ किलोमीटर पाइपलाइन टाकण्याचे नियोजन असून त्यापैकी ९२ किलोमीटरहून अधिक पाइपलाइनचे काम पूर्ण झाले आहे. ढेकू रोडवरील नवनाथ टेकडी परिसरात २८ एमएलटी क्षमतेचे आधुनिक जलशुद्धीकरण केंद्र उभारले जात असून त्याचेही सुमारे ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. याशिवाय १८.६० लाख लिटर आणि १९.५८ लाख लिटर क्षमतेच्या मोठ्या जलकुंभांचे कामही प्रगतिपथावर आहे.
या संपूर्ण योजनेत सोलर प्रोजेक्टचीही तरतूद करण्यात आली असल्याने भविष्यात नगरपालिकेच्या वीज खर्चात मोठी बचत होणार आहे. पर्यावरणपूरक आणि दीर्घकालीन दृष्टीने उपयुक्त ठरणाऱ्या या सुविधेमुळे शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेला अधिक बळकटी मिळणार आहे. यंदाच्या उन्हाळ्यात अमळनेरकरांना पाणीटंचाईची झळ मोठ्या प्रमाणावर सहन करावी लागल्याने ही योजना लवकर पूर्ण व्हावी, अशी अपेक्षा शहरवासीयांमध्ये आहे. त्याच पार्श्वभूमीवर आमदार अनिल पाटील यांनी हा विशेष पाहणी दौरा आयोजित केला होता. कामाची प्रगती पाहून नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनीही समाधान व्यक्त केले.



